कोल्हापूरला आॅक्टोबर हिटचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:36 AM2018-10-15T00:36:53+5:302018-10-15T00:36:58+5:30
कोल्हापूर : आॅक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी कोल्हापूर चांगलेच तापले. पारा ३५ डिग्रीपर्यंत पोहोचला असून, आणखी दोन ...
कोल्हापूर : आॅक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी कोल्हापूर चांगलेच तापले. पारा ३५ डिग्रीपर्यंत पोहोचला असून, आणखी दोन दिवस तो असाच कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ऐन दसऱ्यात तापमान वाढल्याने देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना कसरत करावी लागणार आहे.
पावसाळ्यानंतर व थंडी सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर हिटचा सामना दरवर्षी करावा लागतोच; पण यंदा तापमानात थोडी जास्तच वाढ झाली आहे. त्यात परतीचा एकही दमदार पाऊस नसल्याने वातावरण चांगलेच तप्त झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. पहाटे दाट धुके पडते. सहानंतर हळूहळू धुके पांगू लागते आणि आठ वाजल्यापासूनच तापमान वाढत जाते.
सकाळी नऊ वाजता तर अंगाला चटके बसतात आणि दुपारी बारा वाजता तर सूर्य आग ओकत असल्याने अंग भाजून निघते. वाढलेल्या तापमानाचा परिणाम ग्रामीण भागातही होत आहे. सध्या ग्रामीण भागात खरीप पीक काढणीची लगबग सुरू असून, यावर परिणाम जाणवत आहे. दुपारी बारा ते तीनपर्यंत उन्हामुळे कामच होत नाही.
सध्या नवरात्रौत्सवामुळे नागरिक देवदर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत. कोल्हापूर शहरात अंबाबाई, जोतिबा दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय आहे. रविवारची सुट्टी असल्याने भाविकांच्या वाहनांनी शहराचे रस्ते फुलले होते. सुट्टीमुळे स्थानिकांसह परजिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी बाहेर पडल्याने सगळ्या रस्त्यांवर गर्दी दिसत होती. पार्किंग व्यवस्था पुरेशी नसल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात सूर्यनारायण डोक्यावर आग ओकत असल्याने भाविक हैराण झालेले दिसले. दिवसाचे तापमान कमाल ३५, तर किमान २२ डिग्रीपर्यंत राहिले.
बुधवारी पावसाची शक्यता
उद्या, मंगळवारपर्यंत वातावरण असेच राहणार असले तरी बुधवार (दि. १७) पासून तापमानात घट होणार आहे. हवामान खात्याने बुधवार, गुरुवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
वार कमाल किमान
रविवार ३५ २२
सोमवार ३४ २२
बुधवार ३२ २२
गुरुवार ३२ २१
(तापमान डिग्रीमध्ये)