साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:01 PM2020-03-14T12:01:27+5:302020-03-14T12:07:18+5:30
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा ११ साखर कारखान्यांचे हंगाम बंद झाले असून, आतापर्यंत एक कोटी ६७ लाख टन गाळप झाले आहे. या महिन्याअखेर बहुतांश कारखाने, तर एक-दोन कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४६ लाख टनांनी हंगाम मागे असला तरी उर्वरित कालावधीत २०-२५लाख टन गाळप होऊ शकते.
गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा सध्या ०.२२ टक्क्यांनी कमी दिसत असल्याने पुढील हंगामातील ‘एफआरपी’मध्ये ५० रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामासमोर उसाचे संकट होते. त्यामुळे मागील हंगामातील गाळपाच्या तुलनेत निम्म्यावर ऊस उत्पादन होईल, असा अंदाज होता. गाळप हंगामही उशिरा सुरू झाल्याने अद्याप कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी १० लाख २१ हजार ३५१, तर सांगली जिल्ह्यात ५७ लाख १९ हजार ५७८ असे विभागात एक कोटी ६७ लाख ४० हजार ९२९ टनांचे गाळप झाले. सरासरी १२.१५ टक्के साखर उतारा राखत दोन कोटी ३ लाख ४२ हजार ७६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे २४ लाख ३३ हजार ८२६ टनांनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे २२ लाख १६ हजार ४०२ टनांनी गाळप कमी झाले आहे. हंगाम संपायला अजून पंधरा-वीस दिवस आहेत. सध्या कारखान्यांचे गाळप पाहता दोन्ही जिल्ह्यांत अजून २० ते २५ लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. महापूर आणि अतिवृष्टीने उसाच्या उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्याला मोठा फटका बसेल, असे वाटत होते. मात्र विभागाच्या सरासरी उताºयात ०.२२ टक्क्यांनी घट झाली आहे.
सांगलीच्या ‘एफआरपी’वर परिणाम नाही
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप २४ लाख टनांनी कमी झाले असले तरी साखर उताºयात वाढच दिसत आहे. गेल्या हंगामात जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.१३ टक्के होता, तो आता १२.१८ टक्के असून, शेवटच्या टप्प्यातील गाळपानंतर तो वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सांगलीच्या एफआरपीवर कोणताही परिणाम होणार नाही.
या कारखान्यांचा हंगाम संपला
दौलत (अथर्व ट्रेडर्स), संताजी घोरपडे, भोगावती, आप्पासाहेब नलवडे, डी. वाय. पाटील, उदयसिंगराव गायकवाड (अथणी) , इंदिरा महिला (अथणी), रिलायबल फराळे, इको केन (म्हाळुंगे), कुंभी, मोहनराव शिंदे.
गतहंगामाच्या तुलनेत फार गाळप कमी होईल असे वाटत होते, तसे दिसत नाही. साखर उताराही जवळपास गतवर्षीएवढाच राहील, असा अंदाज आहे.
- अरुण काकडे (प्रादेशिक साखर सहसंचालक)