कोल्हापूरच्या कलाकारांच्या दोन लघुपटांचा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:31 AM2019-12-05T11:31:38+5:302019-12-05T11:33:11+5:30
कोल्हापूर येथील सेव्हन सेकंद कलेक्टिव्हने निर्मिती केलेल्या ‘नाऊ युवर होम’ आणि ‘अडगळ’ या दोन लघुपटांना दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही लघुपटांचे दिग्दर्शन कोल्हापूरचा युवा कलाकार प्रसाद महेकर याने, तर छायांकन प्रशांत सुतार याने केले आहे.
कोल्हापूर : येथील सेव्हन सेकंद कलेक्टिव्हने निर्मिती केलेल्या ‘नाऊ युवर होम’ आणि ‘अडगळ’ या दोन लघुपटांना दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही लघुपटांचे दिग्दर्शन कोल्हापूरचा युवा कलाकार प्रसाद महेकर याने, तर छायांकन प्रशांत सुतार याने केले आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत ‘सीएमएस वातावरण २०१९’ आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नाऊ युवर होम’ या लघुपटाला प्रोफेशनल फिल्ममेकर्स अॅँड फिल्म स्टुडिओज या विभागात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला.
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ३० नोव्हेंंबर रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रवी अग्रवाल आणि सहसचिव मंजू पांडे यांच्या हस्ते प्रसाद महेकर आणि प्रशांत सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गोव्यात झालेल्या सुवर्णमयी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिनी मूव्ही मेनिया शॉर्टफिल्म स्पर्धेतही ‘अडगळ’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पुरस्कार मिळाले. २९ नोव्हेंबर रोजी पणजीत मॅकेनीज पॅलेस येथे झालेल्या वितरण सोहळ्यात प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि अनुक्रमे एक लाख रुपये तसेच २५ हजार रुपयांचे पारितोषिक महेकर आणि प्रशांत सुतार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या लघुपटाची कथा, दिग्दर्शन आणि संकलन प्रसाद महेकर यांनी केले असून, छायांकन व कलादिग्दर्शन प्रशांत सुतार यांनी केले आहे. या लघुपटात जयप्रकाश परुळेकर, सागर खुर्द आणि आसावरी नागवेकर-पोतदार यांनी भूमिका केल्या आहेत; तर स्नेहल शिंदे, सिद्धान्त अथणे आणि अरिहंत भिवटे यांचे साहाय्य आहे.
‘सेव्हन सेकंद कलेक्टिव्ह’ या संस्थेमार्फत महेकर आणि सुतार हे युवा कलाकार गेली सहा वर्षे चित्रपट आणि चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.