कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसराची तासाला स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:31 PM2018-10-04T13:31:08+5:302018-10-04T13:39:08+5:30
नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा परिसर अखंड २४ तास स्वच्छ राहावा या हेतूने महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छता तसेच कचरा उठावाचे काम तीन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अधिकाऱ्यांसह ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर : नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा परिसर अखंड २४ तास स्वच्छ राहावा या हेतूने महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छता तसेच कचरा उठावाचे काम तीन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अधिकाऱ्यांसह ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या बुधवारपासून (दि. १०) करवीस निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांत किमान १५ लाखांच्यावर भाविक मंदिराला भेट देत असतात. त्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील लक्षणीय असते; त्यामुळे मंदिर परिसरात निर्माल्य तसेच कचरा निर्माण होण्याचे प्रमाण मोठे असते. सध्या महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे दोन शिफ्टमध्ये परिसर स्वच्छता आणि कचरा उठावाचे काम आहे. नवरात्रीत ते २४ तास तीन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे.
एका शिफ्टमध्ये साधारण १५ कर्मचारी असतील. तीन शिफ्ट मिळून ४५ कर्मचारी रोज कचरा उठावाचे काम करतील. याशिवाय दैनंदिन कामकाजाप्रमाणे दोन वॉर्डचे मिळून ३० कर्मचारीदेखील सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामात सहकार्य देतील.
नवरात्रौत्सवात जोतिबा रोडवर शेकडो फुल विक्रेते, पूजेचे साहित्य विकणारे विक्रेते बसलेले असतात. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर राहिलेला माल रात्री रस्त्यावरच टाकून जातात; त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. हा अनुभव लक्षात घेऊन तिसऱ्या शिफ्टसाठीही सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत.
महापालिका व पोलीस विभागातर्फे ज्या ठिकाणी र्पाकिंगची सोय करण्यात येईल, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे मोबाईल टॉयलेट व्हॅन उभ्या केल्या जाणार आहेत. या व्हॅनसह मंदिर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे रोज दोनवेळा पाण्याने धुवून घेण्याच्या तसेच औषध फवारणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भाविक सकाळी मंदिरात जात असताना महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत आहेत. तशाच घाणीतून मंदिरात जावे लागत आहे, हा प्रसंग यावर्षी टळणार आहे.
याशिवाय महापालिकेचा एक अग्निशमन दलाचा बंब तसेच दोन रुग्णवाहिका मंदिर परिसरात सतत तैनात केले जातील. मंदिर परिसरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन जातात, त्या काल मंगळवारी स्वच्छ करून घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यातील गाळ, कचरा काढण्यात आला आहे. उत्सवकाळात ड्रेनेजलाईन लिकेज होणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे.