कोल्हापूर हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:48 AM2017-10-23T00:48:22+5:302017-10-23T00:48:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेले चार दिवस शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही राज्यभरात सुट्या आहेत; त्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या झुंडींमुळे शहर जणू पर्यटकांचे रम्यस्थळ झाल्याचे चित्र होते.
गुरुवार (दि. १९) पासून दीपावलीनिमित्त असलेल्या सुट्टीचा लाभ घेत राज्यासह परराज्यांतून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, नृसिंहवाडी, आदी ठिकाणी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, शिवाजी चौक, आदी परिसरात खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत होत्या. वाहतूक व्यवस्थेसाठी शहर वाहतूक शाखेनेही कंबर कसली होती. याकरिता मेन राजाराम हायस्कूल, बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. ही पार्किंगची ठिकाणेही दिवसभर फुल्ल होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहने बाहेर काढताना वाहतुकीच्या कोंडीचे चित्र सर्वत्र दिसत होते. गेल्या चार दिवसांत सरलष्कर भवन मार्गाद्वारे लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या दोन दिवसांत भाविकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनरांगा लावल्या होत्या; तर रांगा तुडुंब झाल्याचे चित्र दिवसभर पाहण्यास मिळत होते. रविवार सुटीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक भाविकांनी दर्शनरांगेतून लागणारा वेळ लक्षात घेता, केवळ मुखदर्शन घेतले. असेच चित्र श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग अर्थात जोतिबा डोंगरावर व नृसिंहवाडी येथे नृसिंह दत्तदर्शनासाठी लागले होते.
राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांमुळे अंबाबाई मंदिर परिसरासह महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, आदी परिसराला शनिवार, रविवार असे दोन दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटक भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे परिसरातील धर्मशाळा, यात्री निवास, आदी ठिकाणे फुल्ल असल्याचे बोर्ड लागले होते. खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह हॉटेलमध्ये जेवण व खरेदीसाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र होते.