कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस सुरू होणार
By admin | Published: May 30, 2014 01:07 AM2014-05-30T01:07:47+5:302014-05-30T01:08:11+5:30
सुनीत शर्मा : मिरजेत आश्वासन
मिरज : कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसची वेळ बदलण्यासह कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस सोलापूरमार्गे सुरू करण्याचे व प्रवासी सुविधांच्या मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक सुनीत शर्मा यांनी दिले. शर्मा यांनी मिरज रेल्वेस्थानकास भेट देऊन पाहणी केली. शर्मा व रेल्वे अधिकार्यांनी कोल्हापूर ते मिरजदरम्यानच्या रेल्वेस्थानकांची व समस्यांची रेल्वे इंजिनातून पाहणी केली. मिरज स्थानकात रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे शाळा, रेल्वे मदत पथक व्हॅन क्रेन, पार्सल आॅफिस, रेल्वे विश्रांतीगृह, आरक्षण कार्यालयासह विविध विभागांची त्यांनी तपासणी केली. यावेळी कामकाजात सुधारणांबाबत त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या. रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे, ज्ञानेश्वर पोतदार, किशोर भोरावत यांनी शर्मा यांची भेट घेऊन, मिरज स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे, कोच इंडिकेटर, पोएट मशीन बसविण्याच्या मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसची सकाळची वेळ बदलून ती मध्यरात्री सोडण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सोलापूरमार्गे नवीन हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी सेनेने शर्मा यांच्याकडे केली. जुलै महिन्यापासून सोलापूर एक्स्प्रेसची वेळ पूर्ववत करण्याचे व सोलापूरमार्गे हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले. शर्मा यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मिरज रेल्वेस्थानकावर स्वच्छता व साफसफाई करण्यात आली होती. अवैध फेरीवाले, भिकारी गायब होते. रेल्वेगाड्या वेळेवर येत-जात होत्या. सायंकाळी महाराष्टÑ एक्स्प्रेसने रेल्वे व्यवस्थापकांचा ताफा पुण्याला रवाना झाला. (वार्ताहर)