कोल्हापूर : उपेक्षितांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम : अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 05:50 PM2018-11-09T17:50:32+5:302018-11-09T17:51:39+5:30
कोल्हापुरात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने समाजातील उपेक्षित लोकांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, संघटनेच्या हसिना शेख, जयश्री मगदूम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर : शहरातदेखील असे काही लोक आहेत की, त्यांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही. अशा उपेक्षित लोकांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना करीत आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढले.
दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाची मेजवानी असते. अशा वेळी आपल्या समाजातील एक वर्ग या आनंदापासून दूर आहे, हे सत्य किती भीषण अस्वस्थ करणारे आहे! वीटभट्टी, ऊसतोड कामगारांसह अनाथ, वंचित लोकांना दिवाळीची भेट म्हणून नवीन कपडे, साड्या व फराळाचे वाटप करण्याचा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या राज्य पदाधिकारी हसिना शेख यांच्या सहकार्यातून गुरुवारी (दि. ८) पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता.
समाजातील सुमारे २०० महिला व पुरुषांना नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मोठी दिवाळी नाही. वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, फिरस्ते अशा समाजातील वंचित लोकांना कपडे, फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे आदर्श काम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना करीत आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे शशिराज पाटोळे, जनसंपर्क अधिकारी समीर गायकवाड, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जयश्री मगदूम, शामलाल बचराणी, नीलेश सुतार, सागर पाटील, पूनम यादव, फरजाना नदाफ, शोभा पाटील, लता पवार, संग्राम पाटील, रोहित नाळे, संग्राम खोत, पंकज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.