कोल्हापूर : देवदासींचे प्रश्न हिवाळी अधिवेशनापूर्वी मागी न लागल्यास घेराओ : श्रीपतराव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 06:38 PM2018-10-05T18:38:37+5:302018-10-05T18:41:48+5:30
देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्रातर्फे (गडहिंग्लज) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
कोल्हापूर : देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्रातर्फे (गडहिंग्लज) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
देवदासी निराधार मुक्ती केंद्र (गडहिंग्लज)तर्फे देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी, शोषित महिला, बेघर, भूमिहीन यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरील धडक मोर्चासाठी देवदासी महिला, तृतीयपंथी गडहिंग्लजवरून बिंदू चौकात दाखल झाले.
या ठिकाणी माजी आमदार, श्रीपतराव शिंदे, प्रा. मेघा पानसरे, प्रा. विठ्ठल बन्ने यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मीपुरी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. विविध मागण्यांचे फलक घेतलेल्या आंदोलक महिलांनी जोरदार घोषणा देऊन मोर्चा मार्ग दणाणून सोडला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार शिंदे यांच्यासह नेत्यांनी देवदासींचा प्रश्न सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वी मार्गी न लावल्यास विधानभवनाला घेराओ घालण्याचा इशारा दिला.
यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. शासनाने २००५ साली केलेल्या देवदासी निर्मूलन कायद्यामध्ये बदल केला पाहिजे, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नियंत्रण मंडळ स्थापन करून देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या विविध योजना ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत राबविण्यात यावे.
देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शन मिळावी; त्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत मोफत घरे बांधून मिळावीत; देवदासींच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी शासनाने ५० हजारांचा आहेर द्यावा; तसेच त्यांच्या मुलामुलींना शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण द्यावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलनात डॉ. अच्युत माने, अशोक भंडारे, बापूसाहेब म्हेत्री, दत्तात्रय मगदूम, चंद्रकांत तेलवेकर, उज्ज्वला दळवी, पूनम म्हेत्रे यांच्यासह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, महिला सहभागी झाल्या होत्या.
देवदासी भाजपला मतदान करणार नाहीत
देवदासींचे प्रश्न या सरकारने लवकरात लवकर न सोडविल्यास येत्या निवडणुकीत देवदासी महिलांसह शोषित महिला या भाजपला मतदान करणार नाहीत, असा टोला श्रीपतराव शिंदे यांनी लगावला.