कोल्हापूर : ...तर भटकी जनावरे महापालिकेच्या दारात बांधणार, नगरसेविका बनछोडे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:15 PM2018-05-15T13:15:17+5:302018-05-15T13:15:17+5:30
येत्या आठ दिवसांत याची दखल घेतली नाही तर सर्व भटकी जनावरे महापालिकेच्या चौकात आणून बांधण्यात येतील, असा इशारा नगरसेविका उमा बनछोडे यांनी महानगरपालिकेच्या सभेत दिला.
कोल्हापूर : शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जेवढा गंभीर आहे, तितकाच तो भटक्या जनावरांचाही आहे. वारंवार सांगूनही अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. जर येत्या आठ दिवसांत याची दखल घेतली नाही तर सर्व भटकी जनावरे महापालिकेच्या चौकात आणून बांधण्यात येतील, असा इशारा नगरसेविका उमा बनछोडे यांनी महानगरपालिकेच्या सभेत दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
शहरात सर्वत्र भटक्या जनावरांचा नागरिकांना उपद्रव होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. महापालिकेभोवती अशी जनावरे आहेत. त्यांचा बंदोबस्त करा, असे सांगूनही काहीच कारवाई होत नाही, ही खेदाची बाब आहे. जर आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर ही जनावरे महानगरपालिकेच्या चौकात आणून बांधू, असा उमा बनछोडे यांनी इशारा दिला.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय तौफिक मुल्लाणी, कमलाकर भोपळे, भूपाल शेटे यांनी उचलून धरला. मुल्लाणी यांनी, गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण जखमी झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कुत्र्यांची गॅँगच्या गॅँग तयार होत असताना महापालिकेचे प्रशासन काय करते? अशी विचारणाही त्यांनी केली.
निर्बीजीकरण केल्यानंतरही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कशी वाढली, अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली. ५००० कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर २५ लाख रुपये खर्च केले; पण ते पाण्यात गेले, असे सांगून ज्या ठेकेदारावर हे काम सोपविले होते, त्यांनी कऱ्हाडहून खासगी, पाळीव कुत्री आणून त्यांच्यावर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, असा आरोप केला.
यावर खुलासा करताना २००९-१० सालानंतर आपल्याकडे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही, असे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी स्पष्ट केले. यावर्षी निर्बीजीकरण करण्याकरिता २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता कामास सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.