कोल्हापूर : विमानतळाबाबत नेत्यांनी थट्टा न थांबविल्यास हिसका दाखवू, शिवेसेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:25 PM2018-11-03T17:25:36+5:302018-11-03T17:27:08+5:30
विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सकाळी अकराच्या सुमारास उजळाईवाडी येथील विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी विमानतळाबाबत नुसते अभिनंदनपर फलक लावून प्रसिद्धी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नात यश येत नसेल तर ही जागाच बाधित आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल उपस्थित करत पक्षातर्फे या ठिकाणी उपहासात्मक होमहवन आंदोलनाला सुरुवात केली.
भटजींचे मंत्रोच्चार व मांत्रिकाच्या वेशभूषेतील कार्यकर्त्याने या आंदोलनात सहभाग घेऊन लोकप्रतिनिधींना सुबुद्धी द्यावी, अशी मागणी केली. हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.
विमानतळासह थेट पाईपलाईन, शाहू जन्मस्थळ, शिवाजी पूल अशा प्रश्नांमध्ये फक्त अभिनंदनपर फलक न लावता ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. यासाठी गटतट व श्रेयवाद बाजूला ठेवावा. तसेच या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची चालविलेली थट्टा थांबवावी, अन्यथा हिसका दाखवू, असा इशारा पवार व देवणे यांनी दिला.
आंदोलनात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवि चौगुले, सुजित चव्हाण, आप्पा पुणेकर, अवधूत साळोखे, राजू यादव, पप्पू नाईक, अभिजित बुकशेठ, आदी सहभागी झाले होते.