कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:10 PM2018-01-06T16:10:54+5:302018-01-06T16:16:20+5:30
जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.
कोल्हापूर : जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.
पंचगंगा प्रदूषण या ज्वलंत विषयावर शिवसेना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी तातडीने हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली.
यावेळी त्यांना शिवसेना, प्रजासत्ताक व स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पंचगंगा प्रदूषणासंदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. यानंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दळवी म्हणाले, पंचगंगा प्रदूषण व जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. आयुक्तांनी या कामासाठी ठेकेदार नेमला असून, बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण करू, आश्वासन दिले आहे. या कामावर दररोज पर्यवेक्षण करून कामाचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
दिलेल्या वेळेत म्हणजे बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर महापालिकेवर कारवाई करावी, असे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही तर कारवाई अटळ आहे.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी मुख्याधिकारी यांना पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
वास्तविक जलप्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, सतीश कुरणे, आदींचा समावेश होता.
‘प्रजासत्ताक’च्या दिलीप देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेले महापालिकेचे आयुक्त, इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर क्रि. प्रो. को. कलम १३३ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार कारवाई करावी.
‘स्वाभिमानी शेतकरी’कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेने सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी शेतीसाठी योग्य राहिलेले नाही. यामुळे इचलकरंजी परिसरातील अनेक लोक काविळीसारख्या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास आंदोलन केले जाईल. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक, आदींचा समावेश होता.