Kolhapur: =पंचगंगेची पातळी ४९ फूटावर गेल्यास कोल्हापुरातून रेल्वे वाहतूक होणार बंद, प्रवासाला निघण्यापूर्वी करा चौकशी
By संदीप आडनाईक | Published: July 27, 2024 09:07 PM2024-07-27T21:07:58+5:302024-07-27T21:08:14+5:30
Kolhapur News: पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पूलाव ४८ फूट पाणी आले आहे. पाण्याची पातळी जर ४९ फूटावर गेली तर कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वेची वाहतूक बंद होण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाने याबाबत इशारा दिला आहे. कोल्हापूर मार्गावरील कोल्हापूर मालधक्का ते रुकडी यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी या ठिकाणी पाण्याची पातळी ४८ फूट इतकी आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
महालक्ष्मी, कलबुर्गी सुटली
दरम्यान, शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कलबुर्गी एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांनी प्रवासी घेउन प्रयाण केले आहे. या दोन गाडया रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पूलावरुन पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. रात्री उशिरा पुण्याकडे धावणारी विशेष रेल्वेसह ४.३० वाजता कोल्हापुरात येणारी हरिप्रिया एक्सप्रेस येणार की नाही हे समजल्यानंतरच इतर सर्व रेल्वे सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जर पाणीपातळी वाढली तर पुढील आठवड्यात रेल्वेसेवा बंद राहणार आहे.