कोल्हापूर : आमच्या जिवाशी खेळाल तर दारात येऊन मरू, ‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागीय उपनिबंधकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:16 PM2018-01-01T19:16:07+5:302018-01-01T19:22:55+5:30
आयुष्यभर सेवा केल्यानंतर साठविलेली पुंजी मिळविण्यासाठी आम्हाला उतरत्या वयात संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. या वयात काही काही आजाराने ग्रासले आहे, उपचारासाठी पैसे नसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तरीही आमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात येऊन मरू, असा इशारा भू-विकास बॅँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाला दिला.
कोल्हापूर : आयुष्यभर सेवा केल्यानंतर साठविलेली पुंजी मिळविण्यासाठी आम्हाला उतरत्या वयात संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. या वयात काही काही आजाराने ग्रासले आहे, उपचारासाठी पैसे नसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तरीही आमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात येऊन मरू, असा इशारा भू-विकास बॅँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाला दिला.
‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची १२ कोटींची देय रक्कम बॅँकेकडे आहे. या मागणीसाठी सोमवारी कर्मचाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर ई-निविदा पत्रकाची होळी करीत अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखविले. त्यानंतर विभागीय उपनिबंधक रंजन लाखे यांच्यासमवेत शिष्टमंडळाची चर्चा झाली.
कर्मचाऱ्यांच्या देय रकमेसाठी बॅँकेची इमारती विक्री करण्याचे आदेश मंत्री समितीने दिले आहेत. त्यानुसार ई-निविदाही दोन वेळा मागण्यात आल्या; पण मालमत्ता पत्रकावर धारणाधिकार स्तंभाखाली ‘बी’ टिन्यूअर असल्याने इमारत घेण्यास कोणी तयार नसल्याचे श्रीकांत कदम यांनी निदर्शनास आणून दिले. ‘एलआयसी’ने इमारत घेण्याची तयारी दर्शविली. त्यांना ‘बी’ टिन्यूअरबाबत दिशाभूल केली. अवसायक व सहकार विभागाला ही इमारत विकायची नाही, असे दिसून येत आहे.
औषधोपचारास पैसे नसल्याने शिवाजी पाटील (शिरगाव), दशरथ पाटील (कुरणी), लता पाटील (शिंपी) यांचे निधन झाले. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सत्तराव्या वर्षी हक्कासाठी आंदोलन करावे लागणे यासारखे दुर्दैव नाही. आमच्या जिवाशी खेळू नका. अन्यथा तुमच्या दारात येऊन आत्महत्या करू, असा इशारा कदम व बी. बी. कांबळे यांनी दिला.
यावर ‘बी’ टिन्यूअर काढण्यासाठी प्रयत्न करा व उपनिबंधक कार्यालयाने नवीन जागा शोधाव्यात, अशी सूचना रंजन लाखे यांनी दिली. यावेळी बॅँकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील, रावसाहेब चौगुले, नंदकुमार पाटील, भरत पाटील, आदी उपस्थित होते.
मग करार कसला वाढविता?
बॅँकेच्या इमारतीत १९८५ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालय आले. त्यांचा करार १९९० मध्ये संपला, तेव्हापासून विनाकरार त्यांचा कारभार सुरू आहे; पण इमारत विक्रीची निविदा निघाल्यापासून नवीन करार करण्यासाठी बॅँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. इमारत विकायची आहे, तर करार का करता? तुम्हाला तिथे ‘सहकार भवन’ उभा करायचे असल्याचा आरोप बी. बी. कांबळे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यांवर येणार आहेत. त्यावेळी आमच्या कुटुंबीयांसह त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे. त्याचबरोबर २६ जानेवारीपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दारात उपोषण सुरू करण्याचा इशारा कदम यांनी दिला.