कोल्हापूर : विभागीय क्रीडासंकुलाला आयआयटी तज्ज्ञांनी दिली भेट, आठ दिवसांत अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:13 PM2018-11-10T18:13:57+5:302018-11-10T18:15:52+5:30
गेल्या नऊ वर्षांपासून विभागीय क्रीडासंकुलातील रखडलेल्या बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची आयआयटीचे प्रा. महमद सलमान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी पाहणी केली. नमुने व बांधकाम ठेकेदाराबरोबर चर्चा केली. या पाहणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर तलावाची दुरुस्ती की अन्यत्र बांधणी याबाबत निर्णय होणार आहे.
कोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून विभागीय क्रीडासंकुलातील रखडलेल्या बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची आयआयटीचे प्रा. महमद सलमान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी पाहणी केली. नमुने व बांधकाम ठेकेदाराबरोबर चर्चा केली. या पाहणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर तलावाची दुरुस्ती की अन्यत्र बांधणी याबाबत निर्णय होणार आहे.
संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलातील बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावात त्या परिसरातील सांडपाणी मिसळते. त्यामुळे जलतरण तलाव तयार होऊन हा तलाव पोहण्यासाठी खुला केला नव्हता. त्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध उपाय सुचविण्यात आले. त्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेर संकुल समितीतर्फे विभागीय आयुक्तांनी आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलातील जलतरण तलावातील बांधकामाचे शनिवारी आयआयटीच्या तज्ज्ञांनी नमुने घेतले.
यात पावसाळा आल्याने त्याची पाहणी दोन वेळा रखडली. मात्र, शनिवारी या पाहणीसाठी अखेर मुहूर्त मिळाला. त्यानुसार प्रा. सलमान यांच्यासह तीन अन्य अभ्यासकांनी तलावाची पाहणी केली. तलावातील बांधकामाचे नमुनेही घेतले. यासह बांधकाम ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशीही सविस्तर चर्चा केली.
बांधकामाबाबतचा आराखडा, छायाचित्रे, आदी माहिती घेतली. आता यावर येत्या आठ दिवसांत अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर प्रा. सलमान हे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना येत्या आठ दिवसांत सादर करणार आहेत.
यावेळी क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडाधिकारी बाजीराव देसाई व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एस. कुंभार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संकुल समितीतर्फे दुरुस्ती की अन्यत्र बांधकाम याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.