कोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:25 PM2018-06-25T19:25:11+5:302018-06-25T19:26:05+5:30
लोकराजा राजर्षी शाहंूच्या नगरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे काम, राधानगरी येथील बंद पडलेले विद्युत केंद्र अशी अनेक कामे शासनाच्या लालफितीच्या काराभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने केली.
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहंूच्या नगरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे काम, राधानगरी येथील बंद पडलेले विद्युत केंद्र अशी अनेक कामे शासनाच्या लालफितीच्या काराभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने केली.
राजर्षी शाहूंच्या नावे शासन योजना सुरू करते, परंतु अशा योजना पूर्णत्वाकडे जात नाहीत ही खेदाची बाब आहे. गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवाभावी वृत्तीने शाहू महाराजांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सुरू केले. याच ठिकाणी असणाऱ्या श्री शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचा सुरू असलेला कारभार सर्वांना ज्ञात आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्थांना केवळ शैक्षणिक उपयोगासाठी दिलेल्या मोफत जागांचा वापर काही संस्था व्यवसायासाठी करून त्यामधून नफा मिळवत आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी असणाऱ्या या मूळ उद्देशाचा विसर होत आहे. तरी सर्व रखडलेल्या कामांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, राजेंद्र पाटील, शशी बिडकर, धनाजी यादव, संजय जाधव, अभिजित बुकशेठ, अरविंद यादव, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
प्रमुख मागण्या...
- - छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करावे
- - राधानगरी धरणाजवळील बंद अवस्थेमधील विद्युत केंद्र सुरू करावे
- - शाहू मिल येथील गारमेंट पार्क सुरू करावे
- - शाहू महाराजांच्या समाधिस्थळाचे काम त्वरित करावे.