खेळाबरोबर पंचगिरीतही कोल्हापूरचा ठसा ; सुनील पोवारची वेगळी वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:21 AM2018-11-13T00:21:53+5:302018-11-13T00:23:32+5:30
कोल्हापूर : सामना कोणताही असो, त्यात संघ भलेही मोठ्या समर्थकांचा असो त्यात निष्पक्ष, कडक निर्णय घेण्यास न कचरणारा पंच, ...
कोल्हापूर : सामना कोणताही असो, त्यात संघ भलेही मोठ्या समर्थकांचा असो त्यात निष्पक्ष, कडक निर्णय घेण्यास न कचरणारा पंच, असा पंच म्हणून कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीत सर्वश्रृत असलेल्या सुनील पोवारने स्थानिक, जिल्हा विभाग, राज्य आणि राष्ट्रीय अशा विविध स्पर्धांत आपल्या पंचगिरीचा ठसा उमटविला आहे.
यात विशेष म्हणजे पाच हजारांहून अधिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंचगिरी करीत करिअरची नवी वाट शोधली आहे.
अकरा वर्षांपूर्वी विविध स्थानिक संघांकडून फुटबॉल खेळताना पंचगिरीबद्दल आकर्षण वाटले; त्यामुळे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून पंच परीक्षा दिली. त्यानंतर आजतागायत १0 वर्षांत दरवर्षी क्रीडा कार्यालयातर्फे भरविल्या जाणाऱ्या शालेय फुटबॉल स्पर्धा, त्यात जिल्हा, ग्रामीण विभाग आणि राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धांमध्ये पंचगिरी करीत आहे. यासह के. एस. ए. लीग, स्थानिक संयोजनातून वर्षभरातील विविध स्पर्धा, डीएसके चषक पुणे, १६, १८ वर्षांखालील आयलीग राष्ट्रीय स्पर्धा, रिलायन्स फौंडेशन, विफाच्या फुटबॉल स्पर्धा, के. एस. ए. अ, ब, क, ड, ई अशा एक ना अनेक फुटबॉल स्पर्धांतही सातत्याने पंच म्हणून सुनील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
बी. कॉम. झालेल्या सुनीलने ११ वर्षांपूर्वी फुटबॉल खेळातून करिअर करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला कोठेही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे वेगळी वाट म्हणून त्याने फुटबॉलमधील पंचगिरीला आपलेसे केले. त्यातून त्याने राष्ट्रीय पातळीवरील पंचाकरिता असणारी कॅट-३ ही परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यामुळे मुंबई येथे रिलायन्सतर्फे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत पंचगिरी करण्याची संधी मिळाली. यात संघमालक सचिन तेंडुलकर, नीता अंबानी, जॉन अब्राहीम, अभिषेक बच्चन या मंडळींनी सुनीलची पाठ थोपटली. या स्पर्धेनंतर त्याने आयलीग ‘ए’ डिव्हिजनमध्येही पंच म्हणून काम केले आहे. यात मोहन बागान, मुंबई एफसी, बंगलोर एफसी, चेन्नई एफसी, सेसा गोवा, साळगावकर, धेंपो, केरळ एफसी अशो संघांच्या सामन्यातही मुख्य पंच, लाईन पंचाची भूमिका पार पाडली आहे.
यासह ‘विफा’तर्फे भरविण्यात येणाºया अनेक राज्य स्पर्धांमध्येही पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. दरवर्षी के. एस. ए. वरिष्ठ गट साखळी सामने - ५६, तर के. एस. ए. ब - ३६, क गट- ३६, ड -३, इ - ७५, गडहिंग्लज साखळी सामने, करवीर, यांसह राज्य, राष्ट्रीय अशा स्पर्धांमध्ये गेल्या १0 वर्षांत पाच हजारांहून अधिक लहान-मोठ्या सामन्यांत सुनीलने पंचगिरी केली आहे. खेळातूनही अशी करिअर वाट मिळते हे सुनीलने साध्य करून दाखविले आहे.
वाणिज्य शाखेचे पदवीधर होऊनही नोकरी काही मिळाली नाही. खेळातून वेगळी वाट म्हणून फुटबॉल पंचगिरीतील परीक्षा देत आहे. त्यात स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचा समावेश आहे. सध्या मी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ‘अ ’ दर्जाच्या स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करता यावे, याकरिता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची के-२ ही परीक्षा देत आहे.
- सुनील पोवार, फुटबॉल पंच