कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात, संस्थानकालीन आठवणींना चित्रप्रदर्शनातून उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:43 PM2018-03-03T20:43:48+5:302018-03-03T20:43:48+5:30
डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याचा योग ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या रूपाने कोल्हापूरकरांना शनिवारी आला.
कोल्हापूर : डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याचा योग ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या रूपाने कोल्हापूरकरांना शनिवारी आला.
कोल्हापूर इक्वेटेरियन असोसिएशनतर्फे न्यू पॅलेसनजीकच्या पोलो मैदानावर या शोचे आयोजन करण्यात आले होते. घोडेस्वारीच्या या कसरतींसह जोडीला संस्थानकालीन राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती शालिनीराजे, आदींच्या उपस्थितीत पोलो मैदान, रंकाळा, पद्माळा, आदी ठिकाणची घोडेस्वारी, शर्यतींच्या छायाचित्र प्रदर्शनाने या क्षेत्रातील कोल्हापूरचा इतिहासच करवीरकरांसमोर उलगडून दाखविण्यात आला.
संस्थानकाळापासून कोल्हापूरमध्ये घोडेस्वारीची परंपरा जपली आहे. त्यावेळी या खेळाला राजाश्रय होता. याच जुन्या खेळाला सध्या स्पर्धात्मक रंग आला आहे. कोल्हापूरची हीच परंपरा जपण्यासाठी या ‘शो’चे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच शालेय विद्यार्थी आणि घोडेस्वारीमध्ये रस असणाऱ्या शौकिनांनी पोलो मैदानावर गर्दी केली होती.
शोमध्ये अनेक शाळांच्या हॉर्सरायडरबरोबरच प्रोफेशनल हॉर्स रायडरसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यामुळे खेळाची रंगत आणखी वाढली आहे. उद्घाटनानंतर पोल बेंडिंग, ट्रोविंग रेस, बॉल बकेट, जम्प्ािंग अरेना, जिमखाना अरेना, टेंट पेगिंग यासह माउंटेड स्पोर्टसचे विविध प्रकार पार पडले. या हार्स शोसाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, अकलूज, सातारा, आदी ठिकाणांहून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा दोन दिवस असणार आहे.
शनिवारी सकाळी उद्घाटनप्रसंगी एअर मार्शल अजित भोसले, शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगीताराजे, मधुरिमाराजे, प्रवीणसिंह घाटगे, व्ही. बी. पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ऋतुराज इंगळे, वीरेंद्रसिंह घाटगे, तुषार घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा
शो जंपिग खुला गट-
(अनुक्रमे पहिले पाच क्रमांक) : कईस दलाल (जॅपलूप), स्वप्निल साने (७ ए. के. स्पोर्टस हॉर्स अकॅडमी), विनायक करनावर (ग्रीन फिंगर स्कूल, अकलूज), के. व्ही. सिंग (जॅपलूप), अमर खराडे (एआयएसएसएमएस, पुणे).
पोल बेंडिंग चिल्ड्रेन गट- चेतन मेंडिगेरी, प्रेम रुणवाल (दोघेही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), वंश जोगनी (जॅपलूप).
शो जंपिग ज्युनिअर गट
कशिश बजाज, निहारिका माणियार, करिश्मा जोशी. (सर्व जॅपलूप), रोहित थोरात (ग्रीन फिंगर, आकलूज).
पोल बेंडिंग - ज्युनिअर गट -
अमर खराडे (एआयएसएसएमएस,पुणे ), कशिश बजाज (जॅपलूप), राजाराम चौधरी - (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).
शो जंपिंग - चिल्ड्रन गट
अनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्ट हॉर्स), रोहन करमरकर, आयान शेख, मैथिली देशमुख (जॅपलूप), अनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्ट हॉर्स).