कोल्हापूर : थंडी वाढल्याने उबदार कपडे विक्रीत वाढ, दसरा चौकात ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:48 AM2019-01-02T11:48:36+5:302019-01-02T11:50:56+5:30
गेले चार दिवस कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दसरा चौकातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी उसळली आहे.
कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दसरा चौकातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी उसळली आहे.
दरवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत शहरात उबदार कपडे मिळतात. दसरा चौकातील स्टॉलवर शहराच्या कानाकोपऱ्यांपासून ते ग्रामीण भागातूनही ग्राहक खरेदीसाठी येतात.
तीन महिन्यांच्या जन्मलेल्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना लागणारी सर्व प्रकारची स्वेटर्स, हातमोजे, कानटोप्या येथे मिळतात. त्याचबरोबर उच्च दर्जाची फुल्ल जॅकेटही मिळतात. गेल्या तीन दिवसांपासून शहरात कडाक्याची थंडी पडल्याने स्वेटर, हातमोजे, कानटोपी व जॅकेट खरेदीसाठी विशेषत: सायंकाळी पाचपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्टॉलवर गर्दी असते.
यामध्ये हाफ स्वेटर ३०० ते ५०० रुपयांपर्यंत तर फुल्ल स्वेटर ३५० पासून ते ७०० रुपयांपर्यंत, हातमोजे ७० पासून ते १२० रुपयांपर्यंत आणि कानटोपी ७० पासून ते १५० रुपयांपर्यंत असा दर आहे. जॅकेट ८०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत आहेत.
स्वेटर ते जॅकेटचे विविध १५ प्रकार आहेत. दसरा चौकाबरोबरच महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड या मार्गांवरील विक्रेत्यांकडे उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उबदार कपड्यांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
थंडी वाढल्याने उबदार कपड्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. दर्जेदार व टिकाऊ असणारे उबदार कपडे पंजाब, दिल्ली या ठिकाणी असलेल्या उत्पादकांकडून आणले जातात. यंदा कडाक्याच्या थंडीचा जोर जास्त असल्याने उबदार कपडे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
- तेनजीन सायंका,
विक्रेते, दसरा चौक