कोल्हापूर : बदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा : गिरीष चितळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:36 PM2018-08-21T12:36:26+5:302018-08-21T12:38:42+5:30
उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.
कोल्हापूर : उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त प्रदीप ताम्हाणे प्रमुख उपस्थित होते.
घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील यांना चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी गिरीष चितळे म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. येथील उद्योजकता हे मोठे नेतृत्व आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे उद्योजकांनी बदल स्वीकारून आपला उद्योग वाढविण्यासाठी गतिमान राहणे आवश्यक आहे. किरण पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने मला भरूभरून दिले आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
कार्यक्रमास महेश यादव, श्रीकृष्ण पाटील, योगेश कुलकर्णी, ओंकार देशपांडे, राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सुधीर राऊत, नितीन वाडीकर, नवीन महाजन, एच. सी. मित्तल, सूरजितसिंग पवार, विजय पाटील, हर्षवर्धन भुरके, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज गुणे यांनी प्रास्ताविक केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. जयेश पाटील यांनी आभार मानले.
नियमित विमानसेवेची प्रतीक्षा
उद्योगाला पूरक असणाऱ्या विविध गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत. मात्र, येथे दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात नियमित विमानसेवा कधी सुरू होते याची आम्ही उद्योजक प्रतीक्षा करीत आहोत, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उद्योगात मराठी माणूस स्थिर होत आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करीत आहे.