कोल्हापूर : डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ, जनजागृतीचे प्रयत्न निष्फळ : मृतांची संख्या ७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:14 AM2018-08-23T11:14:49+5:302018-08-23T11:18:41+5:30
कोल्हापूर शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूच्या डासांचा उद्रेक झाला असून सर्वसामान्य कोल्हापूरकर त्याला बळी पडले आहेत.
कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूच्या डासांचा उद्रेक झाला असून सर्वसामान्य कोल्हापूरकर त्याला बळी पडले आहेत.
जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांत ८९६ जणांना डेंग्यू झाल्याचे, तर ८१८ जणांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन महिन्यांत सात रुग्ण दगावले असले तरी, त्यांपैकी तीन रुग्ण डेंग्यूने मृत झाल्याचे विभागीय मृत्यू संशोधन समितीने जाहीर केले आहे, उर्वरित रुग्णांचा मृत्यू होण्याचे कारण प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
शहरात जानेवारी महिन्यापासून डेंग्यूसदृश रुग्ण आढळून यायला लागले. मे महिन्यापर्यंत ही संख्या अगदीच मर्यादित होती. मे महिन्यात डेंग्यूचे ३१, तर डेंग्यूसदृश ८० रुग्ण आढळून आल्यानंतर महानगरपालिका आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. या यंत्रणेने शहरातील प्रत्येक भागात, प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.
पहिली ११ पथके स्थापन केली, त्यानंतर मलेरिया विभागाचे सहकार्य घेऊन आणखी दोन पथके स्थापन केली. सर्व्हेक्षण सुरू झाले तशी डेंग्यूची नेमकी आकडेवारी व वास्तव समोर यायला लागले. जून महिन्यापासून रुग्णांची ही संख्या अगदीच लक्षणीय दिसून यायला लागली. म्हणून जनजागृती आणि औषध फवारणी असे दोन स्तरावर प्रयत्न सुरू झाले.
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात, तसेच हे पाणी बदलले नाही तर अंड्यातून अळ्यांचा फैलाव होतो, यासाठी घराघरांतील पाण्याची भांडी स्वच्छ करून एक दिवस सुका पाळण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पथकांनी नागरिकांना केले.
नागरिकांनी काही ठिकाणी सहकार्य केले, तर काही ठिकाणी निष्क्रियताही दिसून आली. जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांत मात्र डेंग्यूच्या डासांनी चांगलाच उच्छाद मांडला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धूर व औषध फवारणी केली जाते; पण त्याचा परिणाम डासांवर झालेला नाही; त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरले. डेंग्यू निर्मूलनाचे सर्व प्रयत्न फसले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनी येथील जीवन दिनकर दीक्षित (वय ४९) यांचा मंगळवारी रात्री डेंग्यूने मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्याकडून दीक्षित यांच्यावर झालेल्या उपचाराची तसेच रक्त चाचण्यांची कागदपत्रे महानगरपालिका आरोग्य विभागाने मिळविली आहेत. लवकरच ती विभागीय मृत्यू संशोधन समितीकडे छाननीकरिता पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सातपैकी तीन रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू
गेल्या तीन महिन्यांत शहरात एकूण सात रुग्ण डेंग्यूने दगावल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाकडे आली आहे. त्यांपैकी मृत्यू झालेल्या चार रुग्णांची सर्व कागदपत्रे खासगी रुग्णालयातून उपलब्ध करून घेत विभागीय मृत्यू संशोधन समितीकडे छाननीकरिता पाठविली होती. त्यातील तीन रुग्ण हे डेंग्यूनेच मृत्यू झाल्याचे या समितीने घोषित केले.
एका रुग्णाच्या मृत्यूचे कारण प्रलंबित ठेवण्यात आले आहे. आता चार मृत झालेल्या रुग्णांचे उपचार झालेले सर्व कागदपत्रे या समितीकडे छाननीकरिता पाठविले जाणार असल्याचे महानगरपालिका सूत्रांनी सांगितले. विभागीय मृत्यू संशोधन समिती ही सातजणांची असून मृत्यू झालेल्या व्यक्तींवर केलेले उपचार, रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल तपासून तो रुग्ण कशाने मृत झाला याची घोषणा समिती करते.
डेंग्यू लागण आकडेवारी
महिना सेंटिनल लॅब खासगी लॅब मृत्यू
जानेवारी ११ २० -
फेबु्रवारी ०७ ०२ -
मार्च ०२ ०३ -
एप्रिल ०६ १७ -
मे ३१ ८० -
जून २१७ २८१ ०२
जुलै ५२३ ३७९ ०२
आॅगस्ट १५६ १५८ ०३
- मृत रुग्णांची माहिती
१. संजय अण्णा लोहार, वय ४२, कदमवाडी (१० जून) - डेंग्यूने मृत म्हणून घोषित
२. सतीश हणमंत वंशे, वय ४८, रविवारपेठ (२३ जून) - डेंग्यूने मृत म्हणून घोषित
३. मेघा प्रशांत कोळी, वय ९, रा. कनाननगर (७ जुलै) - डेंग्यूने मृत म्हणून घोषित
४. विष्णू शंकर दबडे, वय ५३ , रा. सदर बाजार (२४ जुलै) - मृत्यूचे कारण प्रलंबित
५. रुचिरा सुनील शिंदे, रा. हुजूर गल्ली, भाऊसिंगजी रोड (३ आॅगस्ट) - मृत्यूचे कारण प्रलंबित
६. संजय रामचंद्र देसाई, रा. नेहरूनगर, (११ आॅगस्ट) मृत्यूचे कारण प्र्रलंबित
७. जीवन दिनकर दीक्षित, वय ४९, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ, (२१ आॅगस्ट) - मृत्यूचे कारण प्रलंबित