कोल्हापूर : नारळाचे भाव वाढले, केरळातील अतिवृष्टीचा काही अंशी परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 04:28 PM2018-08-23T16:28:14+5:302018-08-23T16:33:21+5:30
रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.
कोल्हापूर : रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.
देवपूजा, मानपानासह रोजच्या जेवणात व नाष्ट्यात खोबऱ्यांचा चव म्हणून वापर केला जातो. विशेषत: चटण्यांमध्ये खोबरे चवीसाठी हमखास वापरले जातेच. कोल्हापूर जिल्ह्यात रोज तमिळनाडू, केरळ व कर्नाटकातून सुमारे सहा ते सात ट्रक नारळांची आवक होते. त्यात श्रावण व पुढील महिन्यात येणारा गणेशोत्सव आणि केरळातील भीषण अतिवृष्टीमुळे नारळाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यात मागणी वाढली की दरही वाढतात. त्यानुसार नारळाचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
दिवसाकाठी एका ट्रकमधून सुमारे २५ हजारांहून अधिक नारळ, अशी सुमारे सहा ट्रकमधून दीड लाख नारळांची आवक आहे. पोत्यातील ‘भरती ’नुसार नारळाचे दरही काढले जातात. नारळ आकाराने मोठा असेल तर एका पोत्यात ५० नारळ भरले जातात; तर आकाराने लहान असेल तर एका पोत्यात १०० नारळ भरले जातात.
सद्य:स्थितीत श्रावण, गणेशोत्सव, आदी सणांमुळे नारळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही २० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी या राज्यातून येतात. विशेषत: हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये बोळ नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात.
किरकोळ बाजारात यांची विक्रीची किंमतही अगदी ४० ते ५० रुपये प्रतिनग इतकी आकारली जाते. सणासुदीमुळे नारळाच्या मागणीत गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे.
नारळाचे दर असे (घाऊक बाजार)
- मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )
- लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३०० (पूर्वी १४००)
- कंगणार - शेकडा दर - १५००
- बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००
कोल्हापूरचा विचार करता रोज सहा ट्रकची आवक आहे. कर्नाटक, तमिळनाडूमधून नियमित आवक आहे. मात्र, केरळातील नारळ मुंबई, पुण्याकडे जातो. त्याच्यावर परिणाम झाला आहे. मात्र, कोल्हापूरच्या नारळाच्या बाजारपेठेत केरळातील अतिवृष्टीचा काहीअंशी परिणाम झाला आहे. त्यात श्रावण, येणारा गणेशोत्सव आणि जागेवरील खरेदी किंमत वाढल्याने दरही १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
- अविनाश नासिपुडे,
नारळाचे व्यापारी