कोल्हापूर : उद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:28 AM2018-11-06T11:28:10+5:302018-11-06T11:31:40+5:30
उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरतर्फे कोल्हापुरात दि. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् २०१८ हे औद्योगिक प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक जयेश ओसवाल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘स्टार्ट अप’मधील संकल्पनांना बळ दिले पाहिजे. नवीन उद्योग, उद्योजक पुढे येण्यासाठी त्यांना केवळ भांडवल उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांच्या उद्योग उभारणीला आवश्यक ती मदत केली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.
मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र संकल्पना
या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चेंबर’चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्तविकात या प्रदर्शनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यात देशविदेशातील विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. व्यापार-उद्योग क्षेत्राशी संबंधित शासनाच्या नवीन योजना, जगभरातील नवतंत्रज्ञान आणि संधी, आदींबाबत चर्चासत्रे होणार आहेत. कोल्हापुरात गूळ आणि संरक्षण विभागाला लागणाऱ्या साधनसामुग्री उत्पादनाचे क्लस्टर व्हावे.
व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेणार
विमानतळ नियमित सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत कोल्हापुरात विविध व्यावसायिक, त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यातून त्यांचे प्रश्न समजून घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.