कोल्हापूर : मिस कॉल, संदेशातून मिळते ‘पीएफ’च्या पैशांची माहिती, कोल्हापूर ‘पीएफ’ कार्यालयाकडून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:10 PM2018-03-30T13:10:50+5:302018-03-30T13:10:50+5:30
कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयातर्फे ‘पीएफ’ संदर्भात आॅनलाईन कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ अॅपची निर्मिती केली आहे.
यामध्ये ‘पीएफ’चा दावा (क्लेम) करून संगणकीय पोर्टल किंवा ‘उमंग’ अॅपद्वारे कर्मचारी आपले पैसे काढू शकतात. या अॅपमध्ये आणखी सुविधा करण्यात आली असून त्याद्वारे एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून खातेदाराला ‘पीएफ’च्या खात्यावरील पैशाची माहिती मिळणार आहे.
या आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निधी कार्यालयाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच त्यासाठी प्रत्यक्ष सहीची किंवा कागदपत्रांची गरज लागणार नाही; परंतु त्यांना काही शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाऱ्यांनी ‘युनिव्हर्सल’ क्रमांक सक्रिय (अॅक्टिव्हेट) करावा लागणार आहे.
‘युनिव्हर्सल’ क्रमांकधारक कर्मचाऱ्यांना आपले आधार क्रमांक व बॅँक खाते क्रमांक हे ‘युनिव्हर्सल’ क्रमांकासोबत लिंक करावे लागणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल क्रमांकातील सीम कार्डला आधार क्रमांक लिंक करावा.
ही पुर्तता केल्यानंतर खातेदाराने कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या क्रमांकावर आपल्या मोबाईलद्वारे मिस कॉल किंवा संदेश पाठविल्यास काही वेळातच त्यांच्या माहिती संदेशाद्वारे मिळणार आहे.
‘कोल्हापूर’मध्ये ९००० आस्थापना अन ११ लाख खातेदार
भविष्य निधीच्या कोल्हापूर कार्यालयांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येतात. या विभागात सुमारे ९००० आस्थापना असून त्यामध्ये जवळपास ११ लाख भविष्य निधीधारक कर्मचारी संलग्न आहेत.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४०००, सातारा जिल्ह्यात १५००, सांगली जिल्ह्यात १५००, रत्नागिरीमध्ये १५००, सिंधुदुर्गमध्ये ५०० आस्थापनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोल्हापूर विभागात ५० ‘एमआयडीसीं’चा ही समावेश आहे.
या क्रमांकावर साधावा संपर्क
‘पीएफ’ खात्यावर जमा केलेल्या पैशाची माहिती खातेदाराला मिळण्यासाठी कोल्हापूर कार्यालयाने मोबाईल व दुरध्वनी क्रमाकं उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये ‘७७३८२९९८९९’ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल व ‘०११-२२९०१४०६’ या दुरध्वनी क्रमांकावर मोबाईलवरुन संदेश पाठविल्यास काही क्षणातच खातेदाराच्या मोबाईलवर पैसे किती जमा आहेत याबाबतचा संदेश येतो. याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.