कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घराघरातच; तेजस्विनी, राही, वीरधवल आदींनी कोरोनापासून घेतली दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:42 AM2020-04-03T00:42:00+5:302020-04-03T00:43:12+5:30
- सचिन भोसले कोल्हापूर : कोल्हापूरच्या सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, राही सरनोबत, अनुष्का पाटील, नेमबाज शाहू माने, अनुष्का ...
- सचिन भोसले
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, राही सरनोबत, अनुष्का पाटील, नेमबाज शाहू माने, अनुष्का पाटील, युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव हे कोल्हापुरातील, तर गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांनी मुंबई येथील घरातच राहून कोरोना विषाणू संसर्गापासून खबरदारी घेणे पसंत केले आहे. त्यामुळे ही स्टार मंडळी घरी बसून करतात तरी काय, असा सवाल सर्वांना पडला आहे.
नेमबाज तेजस्विनी सावंत ही दिल्ली येथे होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील घरी चार दिवसांसाठी विश्रांतीकरिता १९ मार्चला आली होती. त्यानंतर संचारबंदी जाहीर झाली. ती आता सकाळी गच्चीवर चालणे, त्यानंतर योगासने, ड्राय पॅ्रक्टिस, दुपारनंतर वाचन आणि पुन्हा सायंकाळी अशाच पद्धतीने स्वत:ला फिट ठेवत आहे.
नेमबाज राही सरनोबत हीही दिल्लीतील स्पर्धा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील राजारामपुरी येथील घरीच वास्तव्याला आहे. तिनेही उद्यमनगरातील एका कारखान्यातून घरातच २५ मीटरचे टार्गेट बनवून घेतले आहे. त्यावर तिचा सराव सुरू आहे. याशिवाय ती वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ड्राय प्रॅक्टिस करते.
वीरधवल खाडे हाही मुंबईतील खार येथील त्याच्या फ्लॅटमध्येच आहे. तो आॅलिम्पिकची तयारी म्हणून २० मार्चला अमेरिकेत अॅडव्हान्स प्रशिक्षणासाठी रवाना होणार होता. तत्पूर्वी कोरोना संसर्गामुळे त्याचे जाणे रद्द झाले. त्याची तहसीलदार म्हणून मुंबई विमानतळावर ड्यूटी आहे. मात्र, त्याला यातून सूट देण्यात आली आहे.
युवा नेमबाज शाहू माने हाही १६ मार्चला नवी दिल्ली येथे निवड चाचणी व विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी गेला होता. मात्र, स्पर्धा रद्द झाल्यामुळे तोही १८ मार्चला कोल्हापुरात पोहोचला. तो सरदार तालीम (शिवाजी पेठ) येथील घरी थांबून आहे. तोही दिवसभरात वाचन, ड्राय प्रॅक्टिस, फिजिकल जिम अशा पद्धतीने दिवस व्यतीत करीत आहे.
नेमबाज अनुष्का पाटील ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरातील घरातच ध्यान, ड्राय प्रॅक्टिस, वाचन करीत आहे; तर कांबळवाडी (ता. राधानगरी) चा युवा नेमबाज स्वप्निल कुसाळेही दिल्लीला स्पर्धेसाठी गेला होता. मात्र, ती रद्द झाल्यामुळे तो १९ मार्चला कोल्हापुरात आला. त्याने स्वत:हून कसबा तारळे येथे वैद्यकीय तपासणी केली. अधिकची दक्षता म्हणून तो स्वत:च्या घरी ‘होम क्वारंटाईन’ आहे.
फुटबॉलपटू अनिकेत जाधवही कोल्हापुरातील शाहूपुरी पाचवी गल्ली येथील घरी आहे. तो मागील महिन्यात इंडियन सुपर लीग स्पर्धा झाल्यानंतर विश्रांतीसाठी कोल्हापुरात दाखल झाला होता. तोही व्यायामाबरोबर जगभरातील नामांकित फुटबॉलपटूंच्या खेळण्याच्या कौशल्याचा अभ्यास व्हिडिओद्वारे करीत आहे. तो जून महिन्यात पुन्हा जमशेदपूरला स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.