कोल्हापूर : पगारी पुजारी नियुक्तीसाठी मुलाखती, तोंडी परीक्षेसह प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:45 PM2018-06-20T16:45:31+5:302018-06-20T16:45:31+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात उमेदवारांकडून तोंडी परीक्षेसह सालंकृत पूजेचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात येत असून गेल्या दोन दिवसांत ४० उमेदवारांनी तज्ज्ञ समितीसमोर मुलाखत दिली. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात उमेदवारांकडून तोंडी परीक्षेसह सालंकृत पूजेचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात येत असून गेल्या दोन दिवसांत ४० उमेदवारांनी तज्ज्ञ समितीसमोर मुलाखत दिली. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो-सायन्स विभागामध्ये देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव यांच्या समितीच्यावतीने या मुलाखती घेतल्या जात आहेत.
त्यात पहिल्या दिवशी ३६ व दुसऱ्या दिवशी ४० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यावेळी समितीच्यावतीने उमेदवारांकडून त्यांची वैयक्तिक माहिती, वैदिक प्रमाणपत्र, पत्ता अशी माहिती भरून घेण्यात आली.
त्यानंतर घेतलेल्या मुलाखतीमध्ये मंदिराशी निगडित माहिती, मंदिर परंपरा, वेदशास्त्रातील श्लोक, मंत्र आणि पूजाशास्त्र, नवरात्रौत्सवातील धार्मिक विधी, किरणोत्सव, दीपोत्सव यांची माहिती विचारण्यात आली.
तोंडी मुलाखतीबरोबरच प्रत्येक उमेदवाराकडून देवीच्या प्रतिकृतीस साडी नेसविणे, दागिन्यांसह सालंकृत पूजा बांधण्याचेही प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे.