कोल्हापूर : इराणी चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून : चंद्रकांत जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:14 AM2018-05-22T11:14:11+5:302018-05-22T11:14:11+5:30
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाहू स्मारक भवनात शुक्रवारपासून रोज सायंकाळी साडेपाच वाजता हा महोत्सव होईल. या कार्यक्रमाला फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया आणि कल्चरल हाऊस आॅफ द इस्लामिक रिपब्लिक इराण यांचे सहकार्य लाभले आहे.
फिल्म सोसायटीतर्फे दर महिन्यात जागतिक सिनेमा माध्यमाची ओळख करून दिली जाते. त्याअंतर्गत होत असलेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी घोब्रान मोहम्मद पौर दिग्दर्शित हॅलो मुंबई व मोहम्मद रेझा रम्हानी दिग्दर्शित ब्लिडींग हार्ट हे चित्रपट दाखविले जातील.
शनिवारी (दि. २६) मोहम्मद रेझा रम्हानी दिग्दर्शित अंडर द स्मोकी रूफ व मोहम्मद दही करिमी दिग्दर्शित ह्युमन कॉमेडी हे चित्रपट प्रदर्शित होतील. रविवारी (दि. २७) मोहम्मद रहेमनानी दिग्दर्शित ‘बेंच सिनेमा’ हा बहुचर्चित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर इराणी चित्रपटावर चर्चा होणार आहे.
जगभरातील क्रांतिपर्व सिनेमाचे वारे सन १९९७ पासून इराणमध्येही वाहू लागले. दहशतीच्या, संघर्षाच्या सावटात इराणचे सांस्कृतिक विश्व, समाजजीवन राजकीय निर्बंधाच्या जोखडाखाली दबून देले असता त्यातून वाट काढणारे चित्रपट तयार झाले.
माजिद माजिदी या दिग्दर्शकाने इराणच्या सिनेमाचा क्रांतिकारी चेहरा समोर आणला इराणची ओळख सांस्कृतिक स्तरावर नेली. काही दिग्दर्शकांना देश सोडावा लागला; पण चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. असेच काही समकालीन चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. महोत्सवाच्या प्रवेशिका शुक्रवारपासून सायंकाळी साडेचार वाजता शाहू स्मारक भवनात उपलब्ध असतील तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.