विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर चिडीचूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:33+5:302021-04-11T04:22:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने शनिवारपासून लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सारे कोल्हापूर शहर चिडीचूप झाले. ...

Kolhapur irritated on the first day of weekend lockdown | विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर चिडीचूप

विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर चिडीचूप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य सरकारने शनिवारपासून लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सारे कोल्हापूर शहर चिडीचूप झाले. एरव्ही गजबजलेले रस्ते अक्षरश: निर्मनुष्य झाले होते. दुकाने, भाजी मंडईसह इतर व्यवहार पूर्णपणे बंद होते. ग्रामीण भागातूनही लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. दुकाने, भाजीपाला विक्री, आठवडा बाजार बंद राहिले.

शुक्रवारी रात्रीपासूनच विकेंड लॉकडाऊनला सुरूवात झाली. शनिवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. अत्यावश्यक प्रवासी वाहनांना मुभा असली तरी पोलिसांकडून शहरातील चौकाचौकात त्यांची तपासणी केली जात होती. त्यामुळे एरव्ही गजबजलेले रस्ते, चौक, गर्दीची ठिकाणी ओस पडली होती. नागरिकांनी दुकाने व घराच्या दारात ग्रुपने गप्पा मारण्यात काही वेळ घालवला. दुपारी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मित्रांशी गप्पागोष्टी करण्यात अनेकजण मग्न होते. शहरातील प्रमुख भाजी मंडईसह बाजारकट्टे पूर्णपणे ओस होते. महाव्दार रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या व्यापारी परिसरात एकदम शुकशुकाट होता. रंकाळा तलाव परिसरातही शांतता होती. सर्व दुकाने बंद ठेवून व्यापारी लॉकडाऊनमध्ये सहभागी झाले होेते. विनामास्क व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस व महापालिका यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. औषध दुकाने सुरू होती, मात्र त्यांच्याकडेही नेहमीसारखी गर्दी नव्हती.

ग्रामीण भागात शनिवारी सकाळपासून ग्रामपंचायतीने लॉकडाऊनचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांनीही उस्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. अनेकांच्या दिनक्रमात बदल झाला असला, तरी शेतकऱ्यांचे वेळापत्रक तेच राहिले. सकाळी उठून दूध काढणे, ते घालणे, जनावरांसाठी वैरण काढणे त्यानंतर शेतातच दिवस घालवला.

केएमटी-एसटीची चाके थांबली...

लॉकडाऊनमुळे केएमटी व एस. टी.ची चाके पुन्हा थांबली. त्यामुळे रंकाळा, मध्यवर्ती बसस्थानक रिकामे होते. गाड्या रांगेत लावून ठेवल्या होत्या. एखादी तुरळक केएमटी बस रस्त्यावर धावताना दिसली. रिक्षाही एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रस्त्यावर आलेली दिसली.

पाेलिसांकडून कसून चौकशी

कोल्हापूर शहराच्या प्रवेशव्दारासह चौकाचौकात पाेलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा फौजफाटा शहरातून फिरत होता. विनाकारण कोणी चौकात गर्दी करून उभे असतील तर त्यांना घरी जाण्याचे आवाहन करत होते. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात होती. मास्क व वाहन परवाना नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात होती. हुल्लडबाजांना पोलिसांकडून प्रसादही देण्यात आला.

अंबाबाई मंदिर परिसरात शांतता

एरव्ही अंबाबाई परिसर भाविकांनी गजबजलेला असतो, त्यात मंदिराला लागूनच महाव्दार राेड असल्याने येथे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र शनिवारी या परिसरात निरव शांतता दिसत होती.

टी. व्ही. पाहणे, खेळातच गेला पहिला दिवस

लॉकडाऊन असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत केले. सकाळी नाश्ता केल्यानंतर टी. व्ही.समोर बसणे अनेकांनी पसंत केले. काहींनी मोबाईलमध्ये आपला वेळ घालवला तर तरूण विविध खेळात गुंतले होते. कॅरमचा आवाज गल्लोगल्ली ऐकू येत होता.

अत्यावश्यक पेट्रोलपंप, औषध दुकानेही थंडच

जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा परिणाम पेट्रोल पंपावर दिसत होता. अनेक पंपांवरील कर्मचारी वाहनांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे नियमित रूग्णांनी दवाखान्यात दाखवणे पुढे ढकलल्याने औषध दुकानेही थंडच होती.

Web Title: Kolhapur irritated on the first day of weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.