कोल्हापूर : हयातीच्या दाखल्यांसाठी आठवड्याची मुदत, पंचवीस हजार निवृत्ती वेतनधारकांचे दाखले सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:39 PM2018-11-30T17:39:09+5:302018-11-30T17:42:22+5:30
शासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत सात डिसेंबरपर्यंतच देण्यात आली आहे. या कालावधीत उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांना पुढील पेन्शन मिळणार नाही, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार जणांपैकी अंदाजे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
कोल्हापूर : शासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत सात डिसेंबरपर्यंतच देण्यात आली आहे. या कालावधीत उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांना पुढील पेन्शन मिळणार नाही, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार जणांपैकी अंदाजे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
विविध शासकीय व निमशासकीय विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन हे कोषागार कार्यालयातून संबंधितांच्या बॅँक खात्यावर जमा होते. ते जमा करण्यापूर्वी संबंधित वेतनधारकाच्या हयातीचे दाखले घेतले जातात. ते सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयाने १ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२ हजार निवृत्तीवेतन धारकांपैकी सुमारे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
कोषागार कार्यालयाकडून ज्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा केले जाते. त्या बँक शाखेमध्ये दि. १ नोव्हेंबर ते दि. ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले उपलब्ध आहेत. त्या नावाच्या यादीतील नावांसमोर त्यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. जे निवृत्तीवेतनधारक स्वाक्षरी करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून निवृत्तीवेतन मिळणार नाही. याची सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत ७ डिसेंबर आहे. तरी उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी लवकरात लवकर दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांचे निवृत्तीवेतन बंद होणार आहे.
- महेशकुमार कारंडे,
जिल्हा कोषागार अधिकारी
‘पीएफ’च्या एक लाख जणांचे दाखले जमा
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे एकूण दीड लाख निवृत्तीवेतनधारकांपैकी एक लाख जणांनी हयातीचे दाखले सादर केले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे. या कार्यालयाकडे खासगी आस्थापनांचे निवृत्तीवेतनधारक आहेत. हयातीचे दाखले करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, लवकरात लवकर उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.