कोल्हापूर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर; जयंतीची तयारी, उत्साही वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:52 PM2018-04-11T16:52:13+5:302018-04-11T16:52:13+5:30
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीची कोल्हापुरात विविध संस्था, संघटनांतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. व्याख्याने, भिम फेस्टिव्हल, प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रमाद्वारे बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासह त्यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीची कोल्हापुरात विविध संस्था, संघटनांतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. व्याख्याने, भिम फेस्टिव्हल, प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रमाद्वारे बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासह त्यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
जयंतीनिमित्त एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशनतर्फे ‘भिम फेस्टिव्हल’ आयोजित केला आहे. याअंतर्गत शुक्रवारी (दि. १३) दुपारी साडेतीन वाजता शाहू स्मारक भवनमध्ये समाजरत्न भिमक्रांती पुरस्काराचे वितरण होईल. रात्री अकरा वाजता बिंदू चौकात प्रबोधनात्मक आतषबाजी होणार आहे.
शनिवारी (दि. १४) संस्थेच्या कार्यालयात प्रतिमा पूजन आणि दुपारी चार वाजता चित्ररथासह मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी दिली. लोक जनशक्ती पार्टीतर्फे ‘भीम महोत्सव’ आयोजित केला असून यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बिंदू चौकात शाहीर उदय आणि प्रभाकर भोसले यांचा ‘निळं वादळ’ हा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता प्रा. शरद कांबळे यांचे ‘देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री सात वाजता कबीर नाईकनवरे प्रस्तुत ‘भीमप्रहार’ हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री बारा वाजता क्रांतीबा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. शनिवारी सकाळी दहा वाजता जयंती सोहळा होणार असल्याची माहिती ‘लोक जनशक्ती’ चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
राजेंद्रनगर, भारतनगर, साळोखे पार्क, सुभाषनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. कसबा बावडा येथील श्री शाहू प्रतिष्ठानतर्फे गुरुवार ते शनिवार (दि. १४) पर्यंत व्याख्यानमाला होणार आहे.
यात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, शहर पोलिस अधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, कवी नारायण पुरी, रविंद्र केसकर, ज्येष्ठ साहित्यीक राजन खान मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ कांबळे यांनी दिली. या विविध कार्यक्रमांच्या तयारी अनेक संस्था, संघटनांकडून जोरदारपणे सुरू असून कोल्हापुरमध्ये उत्साही वातावरण दिसत आहे.
विराट सम्यक ऐक्य मिरवणूक २२ एप्रिलला
बिंदू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ विचारवंत प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांचे ‘भुमिपुत्रांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान, तर रात्री नऊ वाजता प्रबुद्ध गायन पार्टीचा महामानवांच्या विचारांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ‘राष्ट्रनिर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’या विषयावर मुक्त पत्रकार दत्ता थोरे यांचे व्याख्यान आणि रात्री नऊ वाजता शाहीर दिपक गोठणेकर यांचा जागर लोकशाहीरी’चा कार्यक्रम होईल. रात्री बारा वाजता आतषबाजी आणि अभिवादन केले जाणार आहे. विराट सम्यक ऐक्य मिरवणूक दि. २२ एप्रिलला दुपारी तीन वाजता दसरा चौकातून काढण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिली.