कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे जब्बार पटेल यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:04 PM2018-04-03T20:04:18+5:302018-04-03T20:04:18+5:30
शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये त्याचे वितरण शुक्रवारी (दि. १३) दुपारी चार वाजता होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व पुरस्कार निवड समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी त्यांच्याकडे दाखल झालेल्या तीन प्रस्ताव आणि अन्य समिती सदस्यांनी सुचविलेल्या नावांतून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. पटेल यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली.
विद्यापीठ आणि शालिनी कणबरकर यांच्यातील सामंजस्य करारानुसार विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची निर्मिती केली आहे. भाषा, साहित्य, शास्त्र, सामाजिक व नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा, सामाजिक हिताचे लक्षणीय काम करणारी व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन त्यांना पुरस्कार दिला जातो.
पहिला पुरस्कार भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना, तर गेल्यावर्षी दुसरा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी डॉ. राव, ‘रयत’चे माजी अध्यक्ष एन. डी. पाटील आणि आता डॉ. पटेल यांच्या भाषणाची पुस्तिका तयार केली जाणार आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये डॉ. पटेल यांनी कलात्मक दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नाट्य, चित्रपटांतून सामाजिक संघर्षाचे मुद्दे मांडले आहेत. भारतीय नाट्य, चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, निवड समिती सदस्य प्राचार्य बी. एन. खोत, डॉ. भालबा विभूते, एन. व्ही. चिटणीस, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते.
प्रतिभाशाली दिग्दर्शक
पंढरपूर येथे जन्म झालेल्या डॉ. पटेल यांची अत्यंत प्रतिभाशाली, सर्जनशील दिग्दर्शक ओळख आहे. ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘अशी पाखरे येती’ आदी नाटके तसेच ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’, ‘एक होता विदूषक’, असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. वेगळा विषय, वेगळा आशय, वेगळी मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी थिएटर अकॅडमी नावाच्या प्रयोगात्मक नाट्यसंस्थेची स्थापना केली. कुसुमाग्रजांवरील लघुपटासह इंडियन थिएटर, लक्ष्मण जोशी, मी एस. एम. असे काही महत्त्वाचे लघुपट त्यांनी निर्माण केले आहेत. त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत.