कोल्हापूर कलामहोत्सव : संगीताच्या साथीने चित्र- शिल्पाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:38 PM2018-12-25T12:38:45+5:302018-12-25T12:38:58+5:30
व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनी कोल्हापूर कलामहोत्सवात रंगत आणली.
कोल्हापूर : व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनीकोल्हापूरकलामहोत्सवात रंगत आणली.
दसरा चौकातील मैदानावर कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने आयोजित कलामहोत्सवात मान्यवर कलावंतांच्या प्रात्यक्षिकांनी कला महाविद्यालयांतील विद्यार्थीच नव्हे, तर रसिक कोल्हापूरकरांचेही कलाविश्व समृद्ध केले.
कलामहोत्सवात सकाळी चित्रकार विजय टिपुगडे, शिवाजी म्हस्के, आदिती कांबळे, सुनील पंडित, आर. एस. कुलदीप, नेहा जाधव या चित्रकारांनी निसर्गचित्र, पोट्रेट, अॅबस्ट्रॅक अशा विविध प्रकारांतील चित्र कॅनव्हासवर अवतरले. तर समृद्धी पुरेकर यांनी पोलीस बांधवांचे व्यक्तिचित्रण करून त्यांच्या कामाचा सन्मान केला. शिल्पकार अतुल डाके व किशोर पुरेकर यांनी व्यक्तिशिल्प साकारले.
एकीकडे हा चित्र-शिल्पाविष्कार सुरू असताना व्यासपीठावर नादब्रह्म ग्रुपने या महोत्सवात सुरेल वातावरणाची निर्मिती केली. उपशास्त्रीय संगीत मैफल आणि फ्युजनचे सादरीकरण करत त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले.
अमोल राबाडे (बासरी), प्रसाद लोहार, अभिजित पाटील (तबला), नरेंद्र पाटील (आॅक्टोपॅड), प्रदीप जिरगे (सिंथेसायझर), गायिका उषा पोतदार, नागेश पाटील व अंध गायक सिद्धराज पाटील या कलाकारांनी मैफलीला वेगळीच उंची दिली. समन्वयक प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा
सायंकाळच्या सत्रात महेश सोनुले यांच्या रसिकरंजन वाद्यवृंदने मानाचा मुजरा करवीर कलासाधकांना ही गीत मैफल सादर केली. त्यात भालजींपासून ते जगदीश खेबूडकर, आनंदघन, माधव शिंदे, सुधीर फडके, आशा भोसले, व्ही. शांताराम, अनंत माने, दिग्दर्शक यशवंत भालकर या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना त्यांच्या गाजलेल्या गाण्यांच्या सादरीकरणातून मानाचा मुजरा केला.
सुनील गुरव (सिंथेसायझर), स्वानंद जाधव (तबला), हणमंत चौगले (ढोलकी), गुरू ढोले (अॅक्टोपॅड), महेश सोनुले, वेदा सोनुले, वैदेही जाधव (गायन), निशांत गोंधळी (निवेदन) यांनी मैफल गाजवली.
कलाकृतींना वाढती मागणी
कलामहोत्सवातील कलाकृतींना रसिकांकडून वाढती मागणी आहे. दिवसभरात अरुण सुतार, अनिल अहिरे, जगन्नाथ भोसले, अमेय घाटगे या कलाकारांच्या एकूण ८२ हजारांहून अधिक रकमेच्या कलाकृतींची विक्री झाली. महोत्सवाला आता अखेरचे दोन दिवस राहिल्याने कलाकृती पाहण्यासाठी सकाळपासूनच रसिकांची गर्दी होत आहे.