कोल्हापूर : परंपरा पुढे नेणारा ‘कलामहोत्सव’ बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:30 PM2018-12-26T14:30:20+5:302018-12-26T14:33:17+5:30
कलानगरी असलेल्या कोल्हापूरची परंपरा पुढे नेणारा कलामहोत्सव रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बहरला आहे. कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाचा आज, बुधवारी समारोप होणार आहे.
कोल्हापूर : कलानगरी असलेल्या कोल्हापूरची परंपरा पुढे नेणारा कलामहोत्सव रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बहरला आहे. कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाचा आज, बुधवारी समारोप होणार आहे.
येथील दसरा चौकात गेल्या तीन दिवसांपूर्वी कलामहोत्सव सुरू झाला. या महोत्सवातील चौथ्या दिवसाची सुरुवात बुधवारी गणेश वंदनेने झाली. त्यानंतर चित्रकार संजीव संकपाळ, संपत नायकवडी, शीतल होगाडे, चित्रकर्ती जयश्री मगदूम यांनी रचनाचित्र, तर अशोक धर्माधिकाऱ्यांनी जलरंगातील व्यक्तिचित्र, बबन माने यांनी निसर्गचित्राची प्रात्यक्षिके सादर केली.
चित्रकार राजेश कांबळे यांनी आरसात पाहून स्वत:चे चित्र साकारले. विजय चोकाककर, स्वप्निल पाटील यांनी व्यक्तिचित्रण आणि सुनील पंडित यांनी वाहतूक पोलीस यांचे चित्र साकारत प्रात्यक्षिके सादर केली.
स्वरप्रभा वाद्यवृंदचे डॉ.आनंद धर्माधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. त्यांनी अहिर भैरव, भैरव, बिघाम, विभास, परमनामा, अभंगांच्या माध्यमातून सूरमयी सफर घडविली. त्यांना दीपक दाभाडे (तबला), अमित साळोखे (हार्मोनियम), मृणालिनी परूळेकर (व्हायोलिन), मानसिंग पाटील (तानपुरा) साथसंगत दिली.
नाताळची सुटी असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसमवेत कलामहोत्सवाला भेट दिली. त्यातील काहीजण आवडते चित्र, कलाकृतींसमोर आवर्जून ‘सेल्फी’ टिपत होते. सायंकाळनंतर महोत्सवातील गर्दी वाढली.
दरम्यान, आज, बुधवारी सायंकाळी सात वाजता आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कलामहोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार केला जाणार आहे. महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल.
६८ हजारांच्या चित्रांची विक्री
या महोत्सवात मंगळवारी सकाळी एकूण ६८ हजारांच्या चित्रांची विक्री झाली. त्यामध्ये चित्रकार सुनील पंडित यांनी साकारलेले परमपूज्य काटकरसाहेब यांचे, तर शिवाजी मस्के आणि आनंद अहिरे यांच्या निसर्गचित्रांचा समावेश होता, असे कलामहोत्सवाचे संयोजक प्रशांत जाधव यांनी सांगितले.
बालचित्रकला स्पर्धेतील विजेते
या महोत्सवानिमित्त इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटांत बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्यांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये रूद्र मनाडे, श्रावणी बागी, श्रेया पाटील, आदित्य नलवडे, समर्थ खोत, रसिका चव्हाण, अलिशा संकपाळ, सृजन माने, सोना पाटील, अंजली नलवडे, अखिलेश धर्माधिकारी, विशाल मेस्त्री, निखील मुचंडे, आदित्य गवळी, सोनाली पोवार यांचा समावेश आहे.