कोल्हापूर : काव्यमैफिलीतून रसिकांच्या काळजाचा ठाव : रामदास फुटाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:28 PM2018-10-10T16:28:28+5:302018-10-10T16:30:07+5:30
कृषीविषयक वास्तवाची जाणीव, वास्तववादी राजकारण, प्रेम शेतीच्या जाणिवा अशा एक ना अनेक कविता सादर करीत कवी अरुण म्हात्रे, प्रा. सुरेश शिंदे, प्रा. संजीवनी तडेगावकर, प्रशांत मोरे, भरत दौंडकर यांनी रसिकांच्या काळजाचा जणू ठावच घेतला.
कोल्हापूर : कृषीविषयक वास्तवाची जाणीव, वास्तववादी राजकारण, प्रेम शेतीच्या जाणिवा अशा एक ना अनेक कविता सादर करीत कवी अरुण म्हात्रे, प्रा. सुरेश शिंदे, प्रा. संजीवनी तडेगावकर, प्रशांत मोरे, भरत दौंडकर यांनी रसिकांच्या काळजाचा जणू ठावच घेतला. निमित्त होतं, मंगळवारी सायंकाळी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, ‘वात्रटिका’कार रामदास फुटाणे यांच्या अमृतमहोत्सवाचे.
मैफिलीची सुरुवात कवी प्रा. सुरेश शिंदे यांनी वाड्यावर पाच झेंडं, मातीत नाही पिकवलं तरी चाललं, मतं कशी पेरायची, ते पाण्याला आग लावतील, त्यावर आइस्क्रीम तयार करतील, आपण असे कसे, ‘सालोसाल पेरलं मातीत जिरलं ’, अशी; तर कवी भरत दौंडकर यांनी ‘गुंठा गुंठा जमीन विकून गोफ गळ्यात’, ‘उंच उंच उडायला शिकवते माती, खोल खोल गाडायला मागे पुढे पाहत नाही माती ’, अशी शेतीवर आधारित कविता सादर केली.
कवी प्रशांत मोरे यांनी स्त्रीभू्रण हत्येवरील ‘जीव शिणला का गं बया,’, ‘मैना कवितेतील एका कुंकवापाई मैना उडून जाईल’, ‘एका तुफानाला सच्चे दिन देता का कोणी?’ ‘शिवलीस का माझी पहिली पायरी’, तर प्रा. संजीवनी तडेगावकर यांनी ‘रीत माझी येडी खुळी,’ ‘रांगोळी काढताना मीच विसकटून गेले, रंगाचं असंच असत,’ ‘दाटतं ते का मनी हुरहुर काळीज आटतं’ अशा स्त्रीमनावरील काव्यपंक्ती सादर केला.
कवी अरुण म्हात्रे यांनी रामदास फुटाणे यांच्यावरील ‘कटपीस लैलो’, तर ‘२५ वर्षे झाली तरी या ‘टोपी’खाली दडलंय काय?’, ‘वेळच निराळी’ अशा एक ना अनेक मनाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर करीत उत्तरोत्तर कार्यक्रमात रंगत आणली.
यावर ‘वात्रटिका’कार रामदास फुटाणे यांनी शाळेला पैशाची अन् मुलाला शाळेची, गरजलेल्याला तहान, म्हणून आपला भारत महान’, स्त्री कधी मंदिरातील विणा, तर कधी ए.के. ४७’, असा कळस चढविला. मैफिलाची अखेर कवी अरुण म्हात्रे यांनी टीव्ही मालिका ‘उंच माझा झोका’मधील शीर्षकगीताने केली.