कोल्हापूर : स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा, ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:38 PM2018-06-25T14:38:07+5:302018-06-25T14:40:40+5:30
कोल्हापूर शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठेवणे, असे सोपे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्वरूपातील स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कोल्हापूर : शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठेवणे, असे सोपे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्वरूपातील स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध परिसरांत डेंग्यू, हिवतापसदृश रुग्ण आढळत आहेत. महानगरपालिका शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवीत आहे. या मोहिमेसह नागरिकांनी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वच्छता राखण्यासह दक्षता घेणे आवश्यक आहे.
अनेकांच्या घर आणि दुकानांमध्ये फूलदाणी, धातूचे कासव, फेंगशुईचे बांबू, ग्लासमध्ये लिंबू, फिश टँक, फ्रिजचे कंडेन्सर यामध्ये पाणी असते. ते आठ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास त्यात अळ्या होण्याची शक्यता असते; त्यामुळे ते रोज बदलावे. या वस्तूंसह घरातील टेरेस आणि जमिनीवरील पाण्याच्या टाक्या, पाणी साठविलेली भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करून ती २४ तासांपर्यंत कोरडी ठेवावीत.
घर, कॉलनी, अपार्टमेंटचा मोकळा परिसर आणि गटारी स्वच्छ ठेवाव्यात. अनावश्यक झुडपे काढावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे कॅन, आदींमध्ये पाणी साचू देण्यात येऊ नये. कायमच्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावेत. ‘डेंग्यू’ला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
सोपे उपाय
- * घरगुती पाणीसाठे, बॅरेल, हौद, गच्चीवरील टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात.
- * टायर, माठ, पत्र्याचे डबे, नारळाची करवंटी यांची योग्य विल्हेवाट लावावी.
- * गटारे वाहती करावीत. डबकी बुजवून परिसर स्वच्छ ठेवावा.
- * परिसरात गवती चहा, कडूनिंब, तुळशीची रोपे लावावीत.
आहारात हे असणे उपयुक्त
पपईमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. त्याचे सेवन हे रक्तातील प्लेटलेट्स वाढविते. आले घातलेल्या चहा अॅँटी बॅक्टेरिअल असतो. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असते. करक्युमिन असलेली हळद आणि ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्र्यांचा रस आहारात असणे उपयुक्त आहे.
डेंग्यू, हिवताप हा डासांपासून होणारा आजार आहे. अस्वच्छतेमुळे डास होतात. त्यामुळे स्वच्छता राखणे, घरातील पाण्याची टाकी, भांडी, आदी आठ दिवसांतून एकदा कोरडे करण्याची गरज आहे. शहरातील स्थिती लक्षात घेता विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कोरडा दिवस पाळण्यासाठी आवाहन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- उदय गायकवाड,
पर्यावरणतज्ज्ञ
डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत. डेंग्यूच्या अळ्या होणे रोखण्यासाठी घरातील पाण्याचे साठे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. डेंग्यूची लक्षणे दिसू लागल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत. योग्य आहारासह भरपूर पाणी प्यावे.
- उमेश कदम,
वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कसबा बावडा