कोल्हापूर : प्रत्येकाच्या घरी ‘खादी’ पोहोचली पाहिजे : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:35 PM2018-10-02T18:35:33+5:302018-10-02T18:38:29+5:30
सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे
कोल्हापूर : सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे मंगळवारी महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चरखापूजन व खादी भांडार नूतनीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.
खासदार महाडिक म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा महामंत्र दिला. चरख्यावर खादी कपडे निर्मिती करण्याच्या कलेचा प्रचार केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खादीनिर्मिती हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. काळाच्या ओघात खादी व ग्रामोद्योगाला उतरती कळा लागली. यावर अवलंबून असणारे लाखो लोक बेरोजगार झाले. काळाच्या ओघात खादीची विक्री कमी झाली आहे. खादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाखादी’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात एक खादी गेली पाहिजे; तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या तत्त्वाचे आचरण होईल.
गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाल्यावर चरखापूजन झाले. यावेळी प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी खासदार महाडिक यांच्याकडे सौरऊर्जेवर चालणाºया चरख्यांची व एका मोबाईल व्हॅनची मागणी केली. यावर महाडिक यांनी त्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.
यावेळी महात्मा गांधी अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. आशाताई कुकडे, दादासाहेब जगताप, प्रा. गीता गुरव, अॅड. धनंजय पठाडे, अनुराधा भोसले, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा. सुधीर देसाई, राजेश घोरपडे, सविता देसाई, सचिव एस. एल. तुपद, प्रकाश चौगुले यांसह सर्वोदय कार्यकर्ते उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले.