कोल्हापूरकरांनी कष्टातून कारखानदारी उभारली : पवार
By Admin | Published: January 18, 2016 12:14 AM2016-01-18T00:14:29+5:302016-01-18T00:44:29+5:30
जगभरात गौरव : ‘विवेक ’इंजिनिअरिंगच्या नवीन युनिटचे उद्घाटन
शिरोली : कोल्हापूरच्या उद्योजकांनी कष्टाने, जिद्दीने कारखानदारी उभी केली आहे. येथील उद्योगाची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्याला साजेशा कारखान्याची उभारणी विवेक इंजिनिअरिंंगने केल्याचे गौरवोद्गार माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. ते शिरोली येथील विवेक इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या नवीन युनिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते.पवार म्हणाले, अत्याधुनिक यंत्रणा वापरून येथील उत्पादने जगभरात पोहोचली आहेत. जुने जाणकार उद्योजक महादबा मेस्त्री, वाय. पी. पोवार यांनी डिझेल इंजिनच्या माध्यमातून उद्योगाचा पाया रचला आहे, तर नव्या पिढीने हा कोल्हापूरचा आॅटोमोबाईल उद्योग जगभरात पोहोचविला आहे. आधुनिक शेतीसाठी अत्यंत चांगले ट्रेलर आणि शेतीऔजारे निर्माण करण्याचे काम बाबूराव हजारे, जगन्नाथ लिधडे यांनी ‘विवेक’च्या माध्यमातून केले आहे. म्हणूनच आज एवढी मोठी प्रगती झाली आहे. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, हजारे आणि लिधडे यांनी ‘विवेक’च्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम केले आहे. यापाठीमागे दोघांचेही कष्ट आहेत. पन्नास वर्षांच्या मैत्रीचा हा यशस्वी सोहळा आहे. यावेळी आमदार जयंत पाटील यांचेही भाषण झाले.
तत्पूर्वी शरद पवार यांचे धनगरी ढोलांच्या निनादात स्वागत झाले. यावेळी पवार यांच्या हस्ते हजारे आणि लिधडे यांचा सत्कार झाला, तर पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, प्रल्हाद चव्हाण, संजय डी. पाटील, टोपच्या सरपंच धनश्री पाटील, आप्पासाहेब हजारे, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, फौन्ड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष राजू पाटील, ‘आयमा’चे अध्यक्ष कृष्णात पाटील, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, रणजित जाधव, गोशिमा अध्यक्ष देवेंद्र दिवाण, संचालक श्यामसुंदर तोतला, जयदीप चौगुले, निरज झंवर, अतुल पाटील, दीपक पाटील, एम. वाय. पाटील, रामराजे बदाले, जे. आर. मोटवानी, सूरजितसिंग पवार, राहुल बुधले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘मेक इन कोल्हापूर’
इजिप्त दौऱ्यावर गेलो असताना तेथील नाईल नदीवर पाणी उपसण्यासाठी इंजीन बसविले होते, मी तिथे जाऊन पाहिले तर ते इंजिन भारतीय बनावटीचे होते. त्यावर ‘उद्यमनगर कोल्हापूर’असे लिहिले होते, त्यामुळे कोल्हापूरची ख्याती जगभरात पोहोचली आहे, असे पवार म्हणाले.