कोल्हापूर : किरण लोहार यांनी स्वीकारला कार्यभार, स्थगिती मिळाल्याने जिल्हा परिषदेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 07:12 PM2018-10-25T19:12:15+5:302018-10-25T19:13:46+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी झाल्यानंतर त्यांना रजेवर पाठवून चौकशीचा निर्णय झाला होता. त्यानुसार पाचजणांची चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे; परंतु सभेचे इतिवृत्त पाहिल्याशिवाय लोहार यांना रजेवर पाठविणार नाही, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतली होती; पण जेव्हा इतिवृत्त मिळाले तेव्हा मात्र ५ आॅक्टोबर रोजी लोहार यांना मित्तल यांनी एकतर्फी कार्यमुक्त केले होते.
यानंतर चौकशी समितीची एक बैठक होऊन लोहार यांच्याविरोधातील तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ६० हून अधिक तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीच्या आदेशाला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते.
सुनावणीमध्ये लोहार यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरण्यात आली. लोहार हे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ या प्रशासन शाखेचे राजपत्रित अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली करणे, कार्यमुक्त करणे, शिस्तभंगविषयक कारवाई करणे हे सर्व अधिकार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार नाहीत, हे लोहार यांच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांच्या कार्यमुक्तीला मंगळवारी स्थगिती देण्यात आली.
बुधवारी (दि. २४) लोहार यांना या स्थगिती आदेशाची प्रत मिळाली. यानंतर गुरुवारी लोहार दुपारनंतर जिल्हा परिषदेत आले आणि त्यांनी आपल्या मूळ पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच त्यांनी आपला हजर अहवालही अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाला पाठवून दिला.
चौकशी समितीची बैठक १ नोव्हेंबरला
दरम्यान, लोहार यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची बैठक १ नोव्हेंबरला बोलावण्यात आली आहे. तोपर्यंत या तक्रारींची छाननी करण्यात येत असून, यावेळी काहीजणांना सुनावणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.