महापुराच्या विळख्यात कोल्हापूर

By admin | Published: July 14, 2016 12:34 AM2016-07-14T00:34:39+5:302016-07-14T00:34:39+5:30

नदीकाठचा भाग पाण्यात : पाणी पातळीत वाढ; १०७ कुटुंबांचे स्थलांतर; जनजीवन विस्कळीत

Kolhapur is known for its greatness | महापुराच्या विळख्यात कोल्हापूर

महापुराच्या विळख्यात कोल्हापूर

Next

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीचा फटका शहराच्या अनेक भागांना बसला आहे. शहरातील अनेक घरांतून पुराचे पाणी शिरल्यामुळे १०७ कुटुंबांतील ४६३ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दोन ठिकाणचे रस्ते खचले. तीन ठिकाणी भिंती पडण्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडले. शहरातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम असून, धोका वाढण्याचीही शक्यता आहे.
शहराजवळून वाहणाऱ्या पंचगंगा नदीचे पाणी अद्यापही धोका पातळीच्या वरून वाहत असल्याने महापुराचा धोका कायम आहे. नदीचे पाणी सीता कॉलनी, सुतारवाडा, जामदार क्लब, शाहूपुरी कुंभार गल्ली, आदी परिसरातील घरांतून शिरल्याने मंगळवारी रात्रीपासून या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात झाली. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी स्थलांतरित नागरिकांच्या व्यवस्थेत व्यस्त आहेत.
शहरातील रस्ते बंद
पुराच्या पाण्याचा फटका शहराला बसला आहे. जयंती नाल्याचे पाणी नदीत मिसळणे बंद झाल्याने या नाल्याच्या काठावर असणाऱ्या लोकांचीही डोकेदुखी वाढली आहे. व्हीनस कॉर्नरजवळील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ रस्त्यावर पाणी आल्याने लक्ष्मीपुरी ते व्हीनस कॉर्नर हा रस्ता बंद झाला आहे. सिद्धार्थनगरातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, कदमवाडीतून जाधववाडीकडे जाणारा रस्ता तसेच गंगावेशकडून शिवाजी पुलाकडे जाणारा रस्ता, आदी रस्ते पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. शाहूपुरीतील माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर तसेच शहर वाहतूक शाखेच्या समोरील जयंती पुलावर पाणी आले होते; परंतु त्यावरून वाहतूक सुरू होती. ज्या रस्त्यावर पाणी आले त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. पावसामुळे सकाळी सुसर बागेतील वृक्ष कोसळला. खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीतील एका घराची भिंंत कोसळली. शहरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
१०७ कुटुंबे सुरक्षित स्थळी
कोल्हापूर शहरातील सीता कॉलनी, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, उत्तरेश्वर परिसरातील १०७ कुटुंबांतील ४६३ जणांना महापुराचा फटका बसला असून, या सर्वांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने या सर्वांची राहण्याची व्यवस्था दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग, शाहूपुरीतील अंबाबाई विद्यालय, पंचगंगा हॉस्पिटलसमोरील मनपा हॉल, आदी ठिकाणी केली आहे. अत्यावश्यक साहित्य घेऊन या कुटुंबांनी या ठिकाणी आश्रय घेतला आहे. या सर्व कुटुंबांना सकाळी नाष्टा, दुपारचे तसेच रात्रीचे जेवण देण्याची व्यवस्था त्या त्या परिसरातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याशिवाय पंचगंगा तालीम परिसरातील १९ कुटुंबांनी पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन राहणे पसंत केले आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर येथे असलेल्या पंपिंग स्टेशनमधून शहरासाठी पाणी उपसा केला जाते; परंतु पुरामुळे उपसा करणारे पंप पाण्यात अडकले आहेत. मंगळवारी रात्री बालिंगा येथील दोन पंपांपैकी एक पंप बंद पडला. त्यामुळे नागदेववाडी पंपाकडून पाणी घेतले जात आहे. नागदेववाडी, बालिंगा येथे नदीची पातळी आणखी दोन फुटांनी, तर शिंगणापूर येथील पातळी आणखी चार फुटांनी वाढली, तर पंपिंग यंत्रणा पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे. जर तसे घडलेच तर मात्र शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो, असे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले.
वैद्यकीय मदतीसाठी सात पथके
महानगरपालिका आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सात वैद्यकीय पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, तीन सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय २४ तास एक रुग्णवाहिका तैनात आहे. या सात पथकांनी महापुराचे पाणी शिरलेल्या भागांत जाऊन नागरिकांची तपासणी केली. विशेष म्हणजे जर एखादी दुर्घटना घडलीच तर उपचार लवकरात लवकर व्हावेत म्हणून सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे १०, आयसोलेशन हॉस्पिटल येथे १०, तर पंचगंगा हॉस्पिटल येथे पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. औषधांचा पुरेसा साठाही करून ठेवण्यात आला आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडिकर यांनी सांगितले.
ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार
यावर्षीच्या पुरामुळे शहरात ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. राजारामपुरी, शाहूपुरी यासह शहराच्या अनेक भागांत ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यांवर वाहत होते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून तुंबलेल्या ड्रेनेज लाईन साफ करण्यात गुंतले आहेत. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हे काम सुरू होते. ड्रेनेज तुंबल्यामुळे अनेक भागांत मैला रस्त्यांवर पसलेला दिसून आला. गटारीची झाकणे पाण्याच्या दाबामुळे फुटली, वाहून गेली. तुंबलेली ड्रेनेज साफ करण्याकरिता सहा पथके अव्याहतपणे काम करीत आहेत. शहरात साथीचे रोग उद्भवू नयेत म्हणून औषध फवारणी, धूर फवारणी केली जात आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा
कोल्हापूर : जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा आज, गुरुवारी राज्याचे नूतन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आढावा घेणार आहेत. महसूलमंत्री झाल्यानंतर पाटील प्रथमच कोल्हापुरात येत आहेत. मंत्री पाटील यांचे सकाळी ७.२० वाजता कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे आगमन होईल. त्यानंतर ते शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे जातील. येथून सकाळी ११ वाजता ताराबाई पार्क येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नुकतीच त्यांची या संस्थेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर मंत्री पाटील हे कळंबा तलाव येथे दुपारी २.३० वाजता पाणीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून कळंबा तलावातील गाळ काढण्याचे काम शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur is known for its greatness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.