Kolhapur: विजयोत्सवाच्या सरींनी कोल्हापूरचा शाही दसरा साजरा, पावसानंतरही उत्साह कायम 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 12, 2024 07:25 PM2024-10-12T19:25:19+5:302024-10-12T19:25:42+5:30

Kolhapur News: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा विजयोत्सव, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला लाभलेला संस्थानकालीन परंपरेचा वारसा, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा सुंदर मिलाप असलेला कोल्हापूरचा शाही दसरा शनिवारी विजयोत्सवाच्या सरींनी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

Kolhapur: Kolhapur's Shahi Dussehra celebrated by rains of Vijayotsava, excitement remains even after rain  | Kolhapur: विजयोत्सवाच्या सरींनी कोल्हापूरचा शाही दसरा साजरा, पावसानंतरही उत्साह कायम 

Kolhapur: विजयोत्सवाच्या सरींनी कोल्हापूरचा शाही दसरा साजरा, पावसानंतरही उत्साह कायम 

- इंदुमती सूर्यवंशी 
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा विजयोत्सव, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला लाभलेला संस्थानकालीन परंपरेचा वारसा, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा सुंदर मिलाप असलेला कोल्हापूरचा शाही दसरा शनिवारी विजयोत्सवाच्या सरींनी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. नुकत्याच कोसळून गेलेल्या पावसाने अवकाशात उमटलेले इंद्रधनुचे रंग, ढगा आडून डोकावणारी  सूर्याची मावळतीची किरणे, अंबाबाई तुळजाभवानीच्या पालख्या, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन, बंदुकीच्या फैरी झाडून सलामी... अशा देखण्या आणि शाही सोहळ्याने ऐतिहासिक दसरा चौकात सिमोल्लंघनाचा कार्यक्रम रंगला.

शनिवारी सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली या पावसातच भवानी मंडपातून शाही मिरवणूक सुरू झाली. मात्र अर्ध्या तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. खासदार शाहू छत्रपतींच्या स्वागतासाठी न्यू पॅलेस ते दसरा चौक मार्गावरून बुलेटस्वार, पोलिस एस्कॉर्ट व छत्रपती घराण्यातील वाहने अशी मिरवणूक निघाली. सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी शाहू छत्रपती यांचे ऐतिहासिक मेबॅक कार मधून दसरा चौकात आगमन झाले. त्यांच्या हस्ते शमीपूजन व देवीची आरती झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आमदार जयश्री जाधव, उद्योगपती संजय डी पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर माजी खासदार राजू शेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह सरदार घराण्यातील मान्यवर, शासकीय अधिकारी, अंबाबाई, तुळजाभवानी मंदिराचे मानकरी, श्रीपूजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिमोल्लंघनाच्या साेहळ्यानंतर आसमंतात भव्य आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मेबॅक कारमध्ये उभे राहून छत्रपतींनी जनतेकडून सोने स्विकारले. त्यानंतर त्यांचे भवानी मंडप येथे आगमन झाले.दुसरीकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट मार्गे रात्री उशीरा मंदिरात आली. 
 
मिरवणुकीने स्वागत
शाही दसरा महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या पालख्यांचे जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. धनगरी ढोल पथ, बैलगाड्या, तोफगाड्या, घोड्यांवर स्वार झालेले मावळे, अब्दागिरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोल, लेझीम पथके, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, मल्लखांब अशा कलांच्या सादरीकरणाने भवानी मंडप ते दसरा चौक ही मिरवणूक काढण्यात आली.
 
अंबाबाईची रथारुढ पूजा
महिषासुराचा वध केल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई विजयोत्सव साजरा करण्यासाठी रथावर आरुढ होऊन निघाली आहे यारुपात दसऱ्याला देवीची पूजा बांधण्यात आली. अश्विन पौर्णिमेला महाप्रसादाने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता होईल.

Web Title: Kolhapur: Kolhapur's Shahi Dussehra celebrated by rains of Vijayotsava, excitement remains even after rain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.