Kolhapur: बिद्रीत पुन्हा सभासदांची केपीं यांनाच सत्तेची गॅरंटी, विरोधकांचा सुपडासाफ, सर्व २५ जागा सहा हजारांच्या मतांनी विजयी

By विश्वास पाटील | Published: December 6, 2023 08:50 AM2023-12-06T08:50:50+5:302023-12-06T08:52:06+5:30

Kolhapur News: सर्वाधिक ऊसदर, फायदेशीर सहवीज प्रकल्प, अनावश्यक नोकरभरतीला लगाम, नियमित साखर वाटप असा कारखाना उत्तम चालवल्याचा अनुभव असल्यानेच शेतकऱ्यांनी कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांच्याकडेच पुन्हा सत्तेच्या चाव्या दिल्या.

Kolhapur: KP is guaranteed power by the members In Bidri, all 25 seats are won by 6000 votes | Kolhapur: बिद्रीत पुन्हा सभासदांची केपीं यांनाच सत्तेची गॅरंटी, विरोधकांचा सुपडासाफ, सर्व २५ जागा सहा हजारांच्या मतांनी विजयी

Kolhapur: बिद्रीत पुन्हा सभासदांची केपीं यांनाच सत्तेची गॅरंटी, विरोधकांचा सुपडासाफ, सर्व २५ जागा सहा हजारांच्या मतांनी विजयी

- विश्वास पाटील 
कोल्हापूर - सर्वाधिक ऊसदर, फायदेशीर सहवीज प्रकल्प, अनावश्यक नोकरभरतीला लगाम, नियमित साखर वाटप असा कारखाना उत्तम चालवल्याचा अनुभव असल्यानेच शेतकऱ्यांनी कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांच्याकडेच पुन्हा सत्तेच्या चाव्या दिल्या. कारखाना केपी हेच चांगले चालवतील ही गॅरंटी सभासदांना जास्त भावली. आमदार प्रकाश आबिटकर, ए.वाय.पाटील, के.जी. नांदेकर यांच्यासारख्यांच्या हातात कारखाना दिल्यास कारखान्याची चांगली बसलेली आर्थिक घडी विस्कटेल ही भितीही विरोधकांना नेस्तनाबूत करून गेली. मोठ्या ईर्षेने घराबाहेर पडून तब्बल सरासरी सहा हजारांच्या मताधिक्क्यांने व सर्व २५ जागा विजयी करून त्यांनी निर्विवाद सत्ता दिली. तुमच्या राजकारणासाठी आम्ही कारखान्याचा खेळखंडोबा होवू देणार नाही असा स्पष्ट कौल त्यांनी आमदार आबिटकर यांच्यासह ए. वाय. पाटील यांनाही दिला. लोकांनी अत्यंत स्पष्ट कौल दिलाआहे. एकही जागा विरोधकांना न देता त्यांची कारखान्याच्या कारभारात लुडबुड नाकारली आहे..आमचा केपी यांच्या कारभारावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही कारखान्याच्या आवारातही फिरकू नका असेच जणू त्यांनी मतपेटीतून बजावले आहे.

१ - राधानगरी तालुक्याच्या राजकारणात आजपर्यंत ए.वाय.पाटील यांच्या ताकदीची झाकली मुठ होती, ती या निवडणूकीत उघड झाली. त्यांचा खऱ्याअर्थाने सुपडासाफ तरी झालाच शिवाय पुढील राजकारणावरही व त्यांच्या आशाआकांक्षावर पाणी फिरले. बिद्रीतील त्यांचा पराभव कंबरडे मोडणारा आहे. मेव्हणे के.पी.पाटील यांना ते वारंवार भिती दाखवायचे..आता मात्र मेव्हण्यांनेच दाजींना शिंगावर घेतले. या निकालाने कारखानाही गेला आणि त्यांचे विधानसभेचे स्वप्नही कायमचे हवेत विरले.

२ - जिथे सत्ताधारी मंडळी कारखाना चांगला चालवून दाखवतात, तिथे शेतकरी त्यांच्याशीच प्रामाणिक राहतात असाच महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीतील इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती बिद्री कारखान्यात झाली. सामान्य शेतकऱ्याची कारखान्यांकडून फारच माफक अपेक्षा असते. त्यांने पिकवलेला ऊस वेळेत तुटावा, त्याची बिले वेळच्यावेळी मिळावीत, साखर ज्यात्या वेळेला मिळावी, कामगारांना चांगला पगार मिळावा आणि कारखाना भ्रष्टाचाराचे कुरण होवू नये. या सर्व निकषांवर बिद्री जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही कारखान्याच्या स्पर्धेत टिकू शकणारा कारखाना आहे. असे असताना त्यांच्याकडील कारखाना काढून का घ्यायचा याचे कोणतेही समर्पक कारण विरोधकांना देता आले नाही. प्रचारात ९६ कोटीच्या गैरव्यवहाराची जरुर हवा झाली परंतू त्यावर सभासदांनी विश्र्वास ठेवला नाही.

३ - ए.वाय.पाटील यांना सोबत घेणे हा मास्टर स्ट्रोक असल्याचा आविर्भाव विरोधकांचा होता. परंतू या स्ट्रोकनेच त्यांचा खड्डा खणला. ते आल्याने राधानगरीतून भक्कम मताधिक्य मिळेल असे चित्र तयार करण्यात आले परंतू ते साफ खोटे ठरले. के.पी.यांनी कारखान्याच्या सत्तेत ए.वाय. यांना जवळ बसवून घेवूनही कारभारात हस्तक्षेप का करू दिला नाही याचेच उत्तर सभासदांनी मतपेटीतून दिले.

४ - सत्तारुढ आघाडीने नव्या १२ लोकांना संधी दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ हे बळ देणारे होते. आमदार सतेज पाटील यांनीही अनेक जोडण्या लावल्या. कोणतेही निवडणूक कशी काढायची हा मुत्सद्दीपणा मुश्रीफ-सतेज यांच्याकडे आहे. तो यशस्वी झाला. दिनकरराव जाधव यांची सोबत पॅनेलला मानसिक आधार देणारी होती. भाजपचे राहूल देसाई, शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे प्रयत्न या सर्वांचे संघटित प्रयत्न गुलालापर्यंत घेवून गेले.

५- गत निवडणूकीत आमदार आबिटकर यांच्यासोबत खासदार संजय मंडलिक,दिनकरराव जाधव गट होता. परंतू तरीही त्यांनी चांगले मताधिक्क घेतले. यावेळेला आबिटकर-मंडलिक यांना भाजपसह समरजित घाटगे, ए,वाय.पाटील, खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांची ताकद होती. तरीही सत्तारुढ आघाडीचे मताधिक्य वाढले. कारण जास्त गट व जास्त नेते झाल्यावर कारखान्याच्या कारभाराचे वांगे होते असे सभासदांना वाटले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारखान्याची चौकशी लावणार, पै, पै वसूल करणार अशी डरकाळी दिली, ती शेतकऱ्यांना आवडली नाही असेच निकाल सांगतो. जिथे चौकशी करायला पाहिजे त्या कारखान्यांच्या प्रमुखांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि कारखाना चांगला चालवला त्यांची चौकशी करतो म्हणता हा दुटप्पीपणा लोकांच्या नक्कीच लक्षात आला.

५ - बिद्रीच्या प्रचारात शाहू, मंडलिक कारखान्याच्या कारभाराचेही वाभाडे निघाले. शाहूच्या इतिहासात आजपर्यंत कुणी त्यांच्या कारभारावर फारसे तिखट असे ताशेरे मारले नव्हते परंतू के.पी. यांनी वृत्तपत्रांत पान-पानभर जाहिराती देवून त्याचाही लेखाजोखा मांडला. मंडलिक कारखान्याची बिले नियमित मिळत नाहीत, कामगारांच्या पगारांची स्थितीही तशीच आहे. या दोन्हीसह मुश्रीफ यांच्या कारखान्यातही सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. त्या तुलनेत बिद्रीचा कारभार जास्त खुला होता, त्यामुळे के.पी. यांच्यावर केलेले आरोप लोकांना पटले नाहीत.

६ - समरजित घाटगे गेल्यानिवडणूकीत के.पी. यांच्यासोबत होते परंतू आता त्यांनी बाजू बदलली. त्यामागे दोन राजकीय कारणे होती. के.पी यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ होते, त्यामुळे त्यांच्यासोबत जायला नको कारण पुढे विधानसभेला मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकायचा आहे त्यामुळे त्या विरोधाची धार कमी होवू नये याची काळजी समरजित यांनी घेतली. कागलच्या राजकारणात आता मुश्रीफ यांच्यासोबत संजय घाटगे आहेत. त्यामुळे संजय मंडलिक यांचे पाठबळ समरजित यांना महत्वाचे आहे. हा एक पदर या लढतीला होता. खासदार मंडलिक यांच्या खासदारकीला आमदार आबिटकर यांचे बळ असते. त्यामुळे त्यांनी त्यांचा पैरा फेडण्याचे काम केले परंतू हा पैरा आबिटकर यांना महाग पडला.

७ - कारखान्यात लोकांनी जरुर स्पष्ट कौल दिला आहे. विधानसभेलाही याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत. परंतू विधानसभेला काय राजकीय समीकरणे आकाराला येतात हे महत्वाचे आहे. के.पी. यांच्या विधानसभेच्या लढाईला या विजयाची ताकद मिळाली हे मात्र नक्कीच. या निवडणूकीत राधानगरीची बेरिज करण्यात ते यशस्वी झाले. सभासदांनी घवघवीत यश दिल्याने कारखाना अजून उत्तम चालवण्याची त्यांच्या वरील जबाबदारीही वाढली आहे. सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे काम त्यांना आता करावे लागणार आहे.
 

Web Title: Kolhapur: KP is guaranteed power by the members In Bidri, all 25 seats are won by 6000 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.