कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ फुटबॉल लीग : चुरशीच्या लढतीत ‘ऋणमुक्तेश्वर’ची उत्तरेश्वरवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:07 PM2018-12-24T12:07:15+5:302018-12-24T12:11:54+5:30
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १-० अशा चुरशीच्या लढतीत मात केली. हा विजयी गोल ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पुनाळकरने केले.
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १-० अशा चुरशीच्या लढतीत मात केली. हा विजयी गोल ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पुनाळकरने केले.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी दुपारी दोन संघात साखळी फेरीतील सामना झाला. सामन्यांच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या; त्यामुळे उपस्थितांना दोन्ही संघांचा वेगवान खेळ पाहण्यास मिळाला. ऋणमुक्तेश्वरकडून अनिरूद्ध शिंदे, तुषार पुनाळकर, ऋषिकेश पाडळकर, तर उत्तरेश्वरकडून स्वप्निल पाटील, सत्यतेज पाटील, स्वराज पाटील, सुयश हांडे, अभिजित शिंदे यांनी चांगला खेळ केला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी खेळात बदल करीत शॉर्ट पासिंगचा अवलंब केला. आक्रमणाची धार दोन्ही संघांकडून वाढविण्यात आली. ७२ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीवर तुषार पुनाळकरने गोल करीत ऋणमुक्तेश्वर संघाला १-० आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामना बरोबरीत आणण्यासाठी उत्तरेश्वरकडून वेगवान चाली रचल्या; मात्र, त्यांना सामना बरोबरीत आणण्यासाठी गोल करता आला नाही. अखेरीस १-० याच गोलसंख्येवर सामना ऋणमुक्तेश्वर संघाने जिंकला.
आजचा सामना
दु. १.४५ वाजता. कोल्हापूर पोलीस विरूद्ध दिलबहार तालीम ‘ब ’