कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा : ‘प्रॅक्टिस’चा ‘बालगोपाल’वर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:37 PM2018-12-12T14:37:12+5:302018-12-12T14:39:38+5:30
केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला.
कोल्हापूर : केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत आहे. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (‘अ’) आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सायंकाळचा सामना अत्यंत चुरशीने झाला.
सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. त्यात ‘प्रॅक्टिस’च्या ओपारा याने सामन्याच्या १५ मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या २६ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या प्रतीक पोवार याने पेनल्टी किकवर गोल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यावर पुन्हा दोन्ही संघांनी गोल नोंदवून आघाडी मिळविण्यासाठी चढायांचा वेग वाढविला. त्यात सामन्याच्या ४० व्या मिनिटाला ‘प्रॅक्टिस’च्या कैलास पाटील याने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्धात ती आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात ‘बालगोपाल’च्या लकी याने रोहित कुरणे याच्या पासवर सामन्याच्या ४६ व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यावर पुन्हा दोन्ही संघांकडून वेगवान खेळ सुरू झाला. त्यात ‘प्रॅक्टिस’कडून सागर चिले याने सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी ३-२ अशा गोलने वाढविली.
या गोलची आघाडी ‘बालगोपाल’च्या लकी याने पुन्हा रोहित कुरणे याच्या पासवर सामन्याच्या ५६ मिनिटाला गोल नोंदवून कमी केली. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला कैलास पाटील याच्या पासवर ओपारा याने चेंडूला गोलजाळीत धाडून ‘प्रॅक्टिस’ला ४-३ अशा गोलने आघाडी मिळवून दिली.
उर्वरित ही आघाडी कायम राहिल्याने ‘प्रॅक्टिस’ विजयी झाले. दरम्यान, दुपारी झालेला ‘पीटीएम’(ब) आणि ‘उत्तरेश्वर प्रासादिक’ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला. त्यात ‘पीटीएम’कडून रोहित पोवार, तर ‘उत्तरेश्वर प्रासादिक’कडून ओंकार लोकरे याने गोल नोंदविला. ‘सी’ डिव्हिजनमधील नोंदणीसाठी फुटबॉलपटूंची केएसए कार्यालयाबाहेर रांग लागली होती.
आजचे सामने
खंडोबा तालीम मंडळ विरूद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ (दुपारी ३.४५ वाजता)
‘प्रॅक्टिस’ (अ) दहा गुणांवर
या स्पर्धेत आतापर्यंत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत विजय, एक पराभव आणि एक सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे हा संघ १0 गुणांवर आहे. बालगोपाल तालीम मंडळाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामन्यांत विजय मिळविला. दोन सामन्यांत या संघाचा पराभव झाला. हा संघ नऊ गुणांवर आहे.