कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धा : बरोबरीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:10 PM2018-12-14T13:10:24+5:302018-12-14T13:11:40+5:30
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या वरिष्ठ गट फुटबॉल सामन्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल संघ यांच्यातील सामना २-२ अशा, तर शिवाजी तरुण मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला.
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या वरिष्ठ गट फुटबॉल सामन्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल संघ यांच्यातील सामना २-२ अशा, तर शिवाजी तरुण मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला.
शाहू स्टेडियम येथे पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल संघ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रारंभापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार पेठ संघाकडून विकी जाधव, अर्जुन नायक, ओंकार खोत, नीतेश खापरे; तर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाकडून शुभम माळी, ओंकार शिंदे, राकेश परीट, सतेज साळोखे यांनी प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदत दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मध्यंतरास काही मिनिटे शिल्लक असताना मंगळवार पेठ संघाकडून अक्षय माळीने गोल करीत संघाचे खाते उघडले. ही आघाडी फार काळ टिकली नाही. ३९ व्या मिनिटाला दिलबहार संघाच्या ओंकार शिंदेने गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत होता.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी बरोबरी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
यामध्ये दिलबहार तालीम मंडळाकडून हृषिकेश पाटीलने ५५ व्या मिनिटाला गोल नोंदवीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ६३ व्या मिनिटाला मंगळवार पेठ संघाच्या नितीन पोवारने गोल करीत सामन्यात २-२ अशा पद्धतीने बरोबरी केली. ही बरोबरी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या शुभम् साळोखेने सामन्यात गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत ती कायम राहिली.
उत्तरार्धात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाकडून ५३ व्या मिनिटाला रोहित मंडलिकच्या पासवर रियान यादगिरीने गोल करीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरी केली. शिवाजी तरुण मंडळाकडून सुमित जाधव, संकेत साळोखे, शुभम् साळोखे, सुमित घाटगे, करण चव्हाण; तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाकडून उमेश भगत, रोहित मंडलिक, अरबाज पेंढारी यांनी ही बरोबरी कमी करण्याचा शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आल्याने सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला.
प्रेक्षक गॅलरीत युवकांत हाणामारी
शिवाजी तरुण मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्या सामन्याच्या दरम्यान शाहू स्टेडियम येथे प्रेक्षक गॅलरीमध्ये युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर काही मिनिटांतच हाणामारीत झाल्याने प्रेक्षकांत काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी वरील बाजूस पोलीस नसल्याने उपस्थित नागरिकांनी या युवकांची मारहाण करणाºया तरुणांच्या तावडीतून सुटका केली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला.
दोन दिवस सामन्यास सुट्टी
केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यास १४ व १५ डिसेंबर रोजी सुट्टी राहणार आहे. रविवारी (दि. १६) दुपारी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. कोल्हापूर पोलीस संघ यांच्यामध्ये दुपारी १.४५ वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.