कोल्हापूर : ‘खंडोबा’ची ‘संध्यामठ’वर दणदणीत मात, के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबॉल लीग ; पाटाकडील (ब)नेही प्रॅक्टिस (ब)ला ३-० ने केले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:28 PM2018-01-17T19:28:42+5:302018-01-17T19:43:11+5:30
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा ५-३ ने ; तर पाटाकडील (ब) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) चा ३-० असा पराभव केला.
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा ५-३ ने ; तर पाटाकडील (ब) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) चा ३-० असा पराभव केला.
शाहू स्टेडियमवर खंडोबा व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यांत प्रारंभापासून ‘खंडोबा’चेच वर्चस्व राहिले. त्यांच्या अर्जुन शेतगांवकर, अजिज मोमीन, कपिल शिंदे, रणवीर जाधव, सुधीर कोटिकेला यांनी वेगवान चाली रचल्या तर ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजर, सौरभ हारूगले, मोहित मंडलिक, सतीश अहिर यांनी तितक्याच वेगवान चाली रचत दबा झुगारून दिला.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)
१३ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून सौरभ हारूगलेने गोल नोंदवत सामन्यांत संघास आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर १७ व्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून अजिज मोमीनने गोल नोंदवत सामना १-१ अशी बरोबरी साधली.
त्यानंतर २३ व्या मिनिटाला अर्जुन शेतगांवकरने गोल नोंदवत सामन्यात ‘खंडोबा’स
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)
२-१ आघाडी मिळवून दिली. ३८ व्या मिनिटास पुन्हा अर्जुन शेतगांवकरने संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत ३-१ अशी संघास भक्कम स्थिती निर्माण करून दिली.
उत्तरार्धात ४८ व्या मिनिटास ‘खंडोबा’कडून सुधीर कोटिकेलाच्या पासवर अजिज मोमीनने गोल करत सामन्यात ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ५८ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून सतीश अहिरने गोल करत ४-२ अशी आघाडी कमी केली.
६६ व्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून कपिल शिंदेच्या पासवर अर्जुन शेतगांवकरने संघाचा पाचवा व वैयक्तिक तिसरा गोल नोंदविला. या गोलनंतर आघाडी कमी करण्यासाठी ‘संध्यामठ’कडून प्रयत्न झाले.
७७ व्या मिनिटास या प्रयत्नांना यश आले. त्यांच्याकडून आशिष पाटीलने गोल करत ५-३ अशी आघाडी कमी केली. अखेरीस हीच गोलसंख्या कायम राखत सामना खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने जिंकला.
पाटाकडील तालीम मंडळ (ब)ने प्रॅक्टिस क्लब (ब) यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून पाटाकडील(ब)चेच वर्चस्व राहिले. रोहन कांबळे, पवन सरनाईक, शुभम चव्हाण, आकाश काटे, प्रथमेश हेरेकर यांनी वेगवान चाली रचल्या. ३७ व्या मिनिटास पाटाकडील(ब) च्या रोहित पोवारने गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात प्रॅक्टिसकडून शुभम मठकर, जॉन्सन, रोहित भोसले, श्लोक साठम, किरणकुमार चव्हाण यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. ६७ व्या मिनिटास पुन्हा पाटाकडील (ब)कडून शुभम चव्हाणने गोल करत ही आघाडी २-० अशी भक्कम केली.
‘पाटाकडील’कडून ७४ व्या मिनिटास प्रथमेश हेरेकरने संघाचा तिसरा गोल नोंदविला. अखेरपर्यंत सामन्यात प्रॅक्टिस (ब)ला आघाडी कमी करता आली नाही. त्यामुळे हा सामना पाटाकडील (ब) ने जिंकला.
शाहू स्टेडियमवर गुरुवारचा सामना
दु. ४ वा. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ