कोल्हापूर : बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:53 PM2018-08-25T18:53:51+5:302018-08-25T18:56:44+5:30
भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोल्हापूर : भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव, केंद्रप्रमुखांना लॅपटॉप वितरण आणि ई-लर्निंग सॉफ्टवेअर वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते.
पालकमंत्री म्हणाले, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी सव्वा वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांचा भौतिक आणि गुणात्मक दर्जा वाढविला आहे. मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या, नगरपरिषदांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी पालक पैसे देऊन खासगी शाळांमध्ये मुलांना घालू लागले; म्हणून या शाळांचा दर्जा सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतला. यातूनच गेल्या वर्षी ५ कोटी २0 लाख आणि यंदा ७ कोटी रुपये शाळादुरुस्ती आणि बांधकामासाठी दिले आहेत.
प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण सभापती अंबरीश घाटगे म्हणाले, शिक्षण विभागाने गेल्या सव्वा वर्षात मोठी कामगिरी केली आहे.
‘इस्रो’च्या सहलींपासून ते शिष्यवृत्तीची परंपरा टिकविण्यापर्यंत आणि ई-लर्निंगपासून ते डॉ. जे. पी. नाईक अभियानापर्यंत अनेक नवे उपक्रम राबवत जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जे प्रश्न सोडविणे अशक्य वाटत होते, ते सर्व प्रश्न सोडविल्याबद्दल आणि शिक्षण विभागाला मोठा निधी दिल्याबद्दल घाटगे यांनी पालकमंत्री पाटील यांना धन्यवाद दिले.
आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देऊन केंद्र शासनाने मोठे पाऊल उचलले. त्यातील २५ टक्के निधी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी वापरण्याचा निर्णय, ६0५ अभ्यासक्रमांसाठीची शैक्षणिक फी सरकारने भरण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी घेतला. याच पद्धतीने जिल्हा परिषदेला निधी देण्यातही आम्ही मागे पडलो नाही.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील १२६, प्रज्ञाशोध परीक्षेतील १0४ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला; तर १७१ केंद्रप्रमुखांना सुलभ कामकाजासाठी लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी आभार मानले; तर संदीप मगदूम आणि सविता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, शिक्षण समिती सदस्य अनिता चौगले, रसिका पाटील, कल्लाप्पा भोगण, विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
गुणवत्तेवर विदेशी जाणाऱ्या मुलींचा खर्च करणार
गुणवत्तेवर विदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील मुलींसाठी कमी पडणारा निधी देण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. नम्रता खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) ही विद्यार्थिनी एम. एस्सी. फिजिक्स झाली आहे. तिने पत्र लिहून अमेरिकेत पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे; परंतु त्यासाठीचे सात लाख रुपये मी भरू शकत नसल्याचे पत्र मला पाठविले. तिचे वडील चालक आहेत. तिच्या शिक्षणासाठीच्या निधीचा धनादेश आपण रविवारी तिच्याकडे देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. अशा मुलींचे उच्च शिक्षण थांबणार नाही, याची काळजी सर्वांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.