Kolhapur: कोल्हापूरात दणक्यात लक्ष्मीपूजन, दीपोत्सवाला अभ्यंगस्नानाने प्रारंभ
By संदीप आडनाईक | Published: November 12, 2023 08:29 PM2023-11-12T20:29:09+5:302023-11-12T20:29:37+5:30
Kolhapur News: धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने आज, रविवारपासून प्रारंभ झाला आहे.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने आज, रविवारपासून प्रारंभ झाला आहे. अभ्यंगस्नान झाल्यावर देवाचे दर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले गेले. त्यानंतर देवाला फराळ व गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती आणि सायंकाळी लक्ष्मीपूजनावेळी तर सारा परिसर आतषबाजीच्या कडकडाटाने दणाणून गेला. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडला.
दिवाळी म्हणजे आकाशकंदिलाचा झगमगाट, पणत्यांचे तेज, चटपटीत फराळ, फटाक्यांची आतषबाजी, गोधन पूजन, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा या सहा दिवसांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. वसू बारस हा दिवस शेतकरी बांधवांकडून तर शुक्रवारी पार पडलेला धनत्रयोदशी हा दिवस वैद्यकीय क्षेत्राकडून साजरा केला गेला. परंतु नरकचर्तुदशीच्या अभ्यंगस्नानाने खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात झाली.
दणक्यात झाले लक्ष्मीपूजन
नरकचर्तुदशीला उटणे आणि सुवासिक तेलाने अभ्यंगस्नान झाले. या अभ्यंगासाठी उटणे, तेल, साबणासह अत्तर, डिओ, सेंट अशा सुवासिक साहित्यांची खरेदी केली होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी कुबेराचे फोटो, लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले, पान, सुपारी, वस्त्रमाळ, धने, पाच फळे, केळी, धूप, कापूर, सुवासिक अगरबत्ती, अशा पूजा पार पडल्या. दिवसबर पूजेच्या या साहित्यांची महापालिका चौक जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे विक्री सुरू होती. झेंडू ५० रुपये किलो, पाच फळे ८० ते ९० रुपयांना तर धूप, अगरबत्तीची त्यांचा सुगंधावरून किंमत आकारण्यात येत होती.