कोल्हापूर : दहा महिन्यांत अडीच कोटींचा मद्यसाठा जप्त, कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:06 PM2018-10-29T17:06:15+5:302018-10-29T17:07:35+5:30
गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
कोल्हापूर : गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारुचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील फंटर या ठिकाणांहून ट्रक भरून मद्यसाठा आणत असतात.
तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा या नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारीपथक व स्थानिक पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. भरारी पथक एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी करीत असताना, गेल्या दहा महिन्यांत अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा मिळून आला आहे.
दरम्यान, सोमवारी भरारी पथकाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक डी. एस. चव्हाण यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे तवेरा (एम. एच. १२ डीवाय -४९६१) या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटी मद्याचे ५0 बॉक्स मिळून आले. बाजारपेठेत या मद्याची साडेतीन लाख रुपये किंमत आहे.
वाहनचालक किशोर रमेश खेडेकर (वय २३, रा. रा. राजेबाचा मळा, गुरहोली, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक केली. तो हा मद्यसाठा कोणाला नेऊन देणार होता. यासंबंधी चौकशी करीत आहेत. मद्यसाठ्यासह तवेरा वाहनही पथकाने जप्त केले. सलग दोन दिवस पथकाने कारवाईचा धडाकाच लावला आहे.