कोल्हापूर : पन्हाळा, गगनबावडा तालुके क्षयरोगमुक्त करणार : खेमनार, निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:17 AM2018-05-30T11:17:47+5:302018-05-30T11:17:47+5:30
यंदा पन्हाळा, गगनबावडा हे तालुके क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी येथे केला. क्षयरोग निर्मूलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात क्षयरोगमुक्तीच्या दृष्टीने क्षयरुग्णाच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर : यंदा पन्हाळा, गगनबावडा हे तालुके क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी येथे केला. क्षयरोग निर्मूलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात क्षयरोगमुक्तीच्या दृष्टीने क्षयरुग्णाच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊस सभागृहात खेमनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य व क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर आदी उपस्थित होते.
खेमनार म्हणाले, जिल्ह्यातील बारा तालुक्यांत क्षयरुग्ण शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एक लाख ४७ हजार इतक्या लोकसंख्येमध्ये नऊ जूनअखेर ही मोहीम होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जोखमीच्या भागातील विशेषत: झोपडपट्टी, स्थलांतरीत, दुर्गम अशा परिसरात ही मोहीम राबवून क्षयरुग्णांची शोधमोहीम, तपासण्या आणि उपचार या गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे.
यासाठी आरोग्य विभागाने १३८ पथके तयार करण्यात आली आहेत. सध्या १०४ एमडीआर रूग्ण व १८ एक्सडीआर रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सुरू झालेल्या क्षयरोग निर्मुलन मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे. सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचा संकल्प असून त्या दिशेने देशभर क्षयरोग नियंत्रणाचे प्रभावी काम सुरू असल्याचे खेमनार यांनी यावेळी सांगितले. डॉ. उषादेवी कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स, आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तीन टप्प्यात मोहीम
- * पहिला टप्पा -२८ मे ते नऊ जून
- * दुसरा टप्पा - एक ते १२ सप्टेंबर
- * तिसरा टप्पा - दहा ते २१ डिसेंबर