कोल्हापूर : शिकाऊ, कायम परवाने दिवसाला १२० देणार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या आंदोलनाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:47 AM2018-10-31T11:47:59+5:302018-10-31T11:50:02+5:30
कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले.
कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने दुपारी विविध मागण्यांसाठी ताराबाई पार्कातील कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले होते. दुपारी अध्यक्ष सुनील घाटगे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याचा निषेध म्हणून ठिय्या आंदोलन व रक्तदान शिबिर या ठिकाणी झाले.
शिकाऊ व कायम स्वरूपाच्या रोजच्या अपॉइंटमेंट १८० वरून ६० केल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यांच्या अपॉइंटमेंट कमी असल्यामुळे नागरिकांना उशिरा अपॉइंटमेंट मिळत होत्या. याचबरोबर एच.जी. ७ च्या टेस्ट बंद आहेत. त्यासाठी लागणारे किट ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर बसविले तरी त्याचा अहवाल करायला परिवहन निरीक्षकांना वेळ नाही.
याप्रश्नी सकाळी सीपीआर शासकीय रक्तपेढीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३२ जणांनी ठिय्या आंदोलनस्थळी रक्तदान केले. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त परिवहन अधिकारी गोपाळे यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने ६० ऐवजी १२० करतो, असे आश्वासन दिले.