कोल्हापूरची विधानपरिषद बिनविरोध होणार ? फडणवीस, पाटील दिल्लीला गेल्याने चर्चेला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:20 AM2021-11-26T11:20:38+5:302021-11-26T11:21:31+5:30
दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते.
कोल्हापूर : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. असा निर्णय जरी झाला तर मग कोल्हापूरची जागाही बिनविरोध होणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते.
काल, गुरुवारी झालेल्या हालचालींमध्ये मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तेथे एक जागा शिवसेनेकडे आणि एक जागा भाजपकडे आहे. याच पद्धतीने उर्वरित जागा बिनविरोध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. नागपूर आणि धुळे या दोन जागा भाजप एकतर्फी जिंकणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. म्हणूनच काँग्रेस आणि भाजपने केवळ लढाई करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याची चर्चा आहे.
कोल्हापूरचे काय ?
कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहता भाजपने निर्णय घेतल्यास महाडिक काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. जर दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर हीच लढाई पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी माघारीच्या दुपारी तीनपर्यंत साऱ्यांचे लक्ष दिल्ली, मुंबईतील निरोपाकडे राहणार आहे.